औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालयास लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देणार
औरंगाबाद:-औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रूग्णालयास स्व. विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला असल्याची माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आ. प्रदीप जैस्वाल, सदस्य आ. सतीश चव्हाण, इक्बालसिंग गिल, मकरंद कुलकर्णी, मेहराज पटेल, भाऊसाहेब जगताप, नारायण कानकाटे, अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. काशीनाथ चौधरी आदींची उपस्थिती होती.
लोकनेते विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी विशेष बाब म्हणून येथे कर्करोग शासकिय रुग्णालयास मंजुरी दिली होती तसेच तात्काळ आदेश दिले होते त्यांच्या विशेष प्रयत्नाने आज राज्यातील मराठवाडा विदर्भ खानदेश विभागातील रुग्ण उपचाराचा लाभ घेत आहेत त्यांच्या कार्याचे स्मरण राहावे म्हणून तात्काळ त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.