• Sat. Feb 7th, 2026

शिंदे गटाचा खासदार ‘केसीआर’च्या गळाला; बीआरएसच्या नेत्याची घेतली भेट

Byjantaadmin

Jul 17, 2023

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (BRS) पक्ष सध्या महाराष्ट्रात हळूहळू पण जोमाने पाय पसरत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आता बीआरएस पक्षाकडे इतर पक्षातले दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते आकृष्ट होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही बीआरएस’ने जम बसवण्यास सुरुवात केली असून काही मोठी नावे पक्षात प्रवेश करत आहेत.विशेष म्हणजे श्रीरामपूर इथे मेळाव्याच्या निमित्ताने आलेले बीआरएसचे खासदार बी.बी.पाटील यांच्या जेष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.श्रीरामपूरमध्ये रविवारी झालेल्या बीआरएस पक्षाचा मेळावा पक्षाचे तेलंगणामधील मराठी भाषिक खासदार बी.बी.पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तालुक्यातील अनेक नेते कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. या मेळाव्याचे आयोजन जिल्हा समनव्यक अशोक बागुल यांनी केले होते. यावेळी पक्षाचे बी.जे.देशमुख, सुवर्णा काठे,माणिकराव देशमुख आदी राज्यातील नेते उपस्थित होते.

BRS in Maharashtra :

श्रीरामपूरचे माजी आमदार आणि सहकारातील जेष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांनी गेल्या महिन्यातच तेलंगणात मुख्यमंत्री  KCR यांची भेट घेतली होती. तसेच तिथल्या सरकारच्या कामांची पाहणी करून कौतुक केले होते. मुरकुटे यांनी अद्याप अधिकृत बीआरएस पक्ष प्रवेश केलेला नाही.या पार्श्वभूमीवर मेळाव्यास उपस्थित नसलेले भानुदास मुरकुटे यांनी आपल्या निवासस्थानी खासदार बी.बी.पाटील यांना जेवणासाठी निमंत्रित केले होते. यानिमित्ताने मुरकुटे यांच्या निवासस्थानी झालेल्या सदिच्छा भेटीवेळी शिर्डीचे शिवसेना शिंदे गटाचे खा.सदाशिव लोखंडे उपस्थित होते.त्यांनीही खा.पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन 2014 आणि 2019 ला शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले. तेSHIVSENA SHINDE गटासोबत आहेत. 2024 साठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळेल, असे बोलले जात असले तरी लोखंडे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी वाढल्याचीही चर्चा आहे.काही सर्व्हेमध्ये ही नाराजी व्यक्त होत असल्याने येथून पक्षीय जागा वा उमेदवार आदलाबदल शक्यता बोलली जात आहे. अशात शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने लोखंडे यांच्याकडून काही चाचपणी तर नाही ना अशी चर्चा राजकीय विश्लेषकांत आहे.मात्र या भेटीबद्दल अजून खा.लोखंडे यांच्या कडून कोणतेही वक्तव्य पुढे आलेले नाही. संसदेत बी.बी.पाटील खासदार असल्याने खा.लोखंडे यांची ही सदिच्छा भेट वा योगायोगाने झालेली भेट असू शकते.SHRIRANPUR विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने येथून खा.लोखंडे आपल्या मुलाला लाँच करण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. 2009 ला मुंबईतून मनसेच्या उमेदवारीवर पराभूत झालेले सदाशिव लोखंडे यांना शिर्डी-श्रीरामपूर मतदारसंघात आणण्यात अनेक नेत्यांपैकी मुरकुटे यांचेही प्रयत्न होते असे बोलले जाते.दरम्यान श्रीरामपूर मेळाव्यानंतर मुरकुटे यांच्या निवासस्थानी झालेल्या वेगळ्या सदिच्छा भेटीबद्दल स्थानिक आयोजकांमधे नाराजी असल्याचे पुढे येत आहे. मतदारसंघ राखीव असताना उमेदवारीशी संबंध नसलेले तालुक्यातील नेते यात का रस घेत आहेत, असा प्रश्न अशोक बागुल यांनी नाव न घेता उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *