• Fri. Jun 27th, 2025

दोन्ही गटांकडून कायदेशीर लढाईची जोरदार तयारी, शरद पवार गटाची 3000, अजितदादा गटाची 5000 प्रतिज्ञापत्रे दाखल

Byjantaadmin

Jul 6, 2023

आम्ही बंडखोरांच्या गटाविरोधात कोणतीही कायदेशीर लढाई करणार नाही, असा दावा करणारे राष्ट्रवादीचे संस्थापक -अध्यक्ष शरद पवार यांनी कायदेशीर लढाईची जोरदार तयारी केली आहे. चव्हाण सेंटर येथील बुधवारी (५ जुलै) झालेल्या शक्तीप्रदर्शनाच्या बैठकीवेळी तीन हजार कार्यकर्त्यांकडून एकनिष्ठतेची प्रतिज्ञापत्रे भरुन घेण्यात आली. येथे कार्यकर्त्यांना निशुल्क स्टँप पुरवण्यात आले. अजित पवार गटाने ५००० प्रतिज्ञापत्रे (अॅफीडेव्हीट) दाखल करून घेतली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडूक आयोगाकडे पक्ष व चिन्हाचा वाद गेला. त्यावेळी सेनेच्या दोन्ही गटांनी लाखों प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. तोच प्रकार आता राष्ट्रवादीत होत आहे. आज चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाची बैठक झाली. त्यावेळी राज्यभरातून कार्यकर्ते, आमदार व पदाधिकारी आले होते. सेंटर समोरच्या मंडपात प्रतिज्ञापत्रे भरण्यासाठी १० काऊंटर होते. तेथे प्रत्येक कार्यकर्त्याला आधार कार्ड दाखवताच १०० रुपयांचा स्टँप निशु:ल्क दिला जात होता. या स्टँपवर ‘‘अजित पवार यांच्या पक्षविरोधी कारवायाचा मी निषेध करतो आणि शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्षाचे उद्दीष्ट पूर्ण करेन’’, असा मजकूर आहे.

कार्यकर्त्यांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक टाकून प्रतिज्ञापत्र भरण्यात येत हाेते. त्याचे लगेच नोटरी केले जात होते. दुपारी २ वाजता ३ हजार प्रतिज्ञापत्रे भरण्यात आली. यापुढेही प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याची प्रक्रिया चालुच राहील, असे पक्षाच्या युवा आघाडीचे मेहबुब शेख यांनी सांगितले.

ओबीसींच्या आरक्षणप्रकरणी ट्रीपल टेस्टसंदर्भात याचिका केलेले धुळ्याचे अॅड. राहुल वाघ यासंदर्भात म्हणाले, ‘’प्रतिज्ञापत्र हे सत्यकथन असते. कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी हा प्रकार चालु आहे. कायदेशीर लढाईत वेळ काढण्यासाठी याचा गैरवापर होतो आहे.’’ वांद्रे येथील एमईटी संस्थेत झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत ५ हजार प्रतिज्ञापत्रे भरुन घेतली.

सोशल मीडियावर पुतण्यापेक्षा शरद पवार जास्त लोकप्रिय!

दादांचे २१ लाख, शरद पवारांचे ३६ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊनही शरद पवार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजित पवारांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणात सोशल मीडियाच्या प्रभावाचे महत्त्व लक्षात घेता शरद पवार यांच्यासाठी पुढील लढाई लढण्यासाठी याची मदत होऊ शकते. राष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवार यांचे ट्विटरवर सुमारे २८ लाख फॉलोअर्स आहेत. तर महाराष्ट्राचे नेते असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केवळ १५ लाख फॉलोअर्स आहेत. ट्विटर बरोबरच फेसबुकवरही शरद पवार हे पुतणे अजित पवार यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. शरद पवार यांचे फेसबुकवर ८.८४ लाख फॉलोअर्स आहेत तर अजित पवारांचे फक्त ६.९८ लाख फॉलोअर्स आहेत.

प्रमुख नेत्यांचे ट्विटरवर फॉलोअर्स असे

सुप्रिया सुळे : १६ लाख छगन भुजबळ : २.२२ जयंत पाटील : ६.१० जितेंद्र आव्हाड : ७.७३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *