• Fri. Feb 6th, 2026

दादांची एन्ट्री, शिंदेसेनेत टेन्शन; चिंता नको, 50 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या, तयारीला लागा – मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

Byjantaadmin

Jul 6, 2023

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री, नेते, खासदार आणि आमदारांची बैठक रात्री उशीरा पार पडली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना आश्वासन दिले की, राज्यात होत असलेल्या घडामोडींची तुम्ही अजिबात चिंता करू नका. 2024 पर्यंत मीच मुख्यमंत्री आहे. बाहेर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. आपले 50 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यासाठी जोरदार कामाला लागा, अशा सूचना त्यांनी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

चुकीचा प्रचार, शिंदेंच मुख्यमंत्री असतील

दरम्यान, बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा अजिबात प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. आम्ही मोठ्या ताकदीने पुढील निवडणूकांसाठी तयार करणार आहोत, तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. बोटावर मोजण्याइतके आमदार राहिलेल्या लोकांनी चुकीच्या अफवा पसरवू नये, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिली.

दिवास्प्नन पाहू नये, तयारीच्या सूचना

तर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, काही लोक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून हटवले जाणार अशी दिवास्वप्न पाहत आहेत. परंतू त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी आम्हाला निवडणूकीच्या तयारीसाठी लागा, लोकांच्या कामावर विशेष लक्ष द्या, अशा सूचना दिल्या आहेत.

आतापासून मोर्चेबांधणीला सुरूवात
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष संघटना, राज्यातील गाव, वाडी वस्ती पातळीवर मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना पक्ष कार्यकारिणीने राज्यातील जिल्हा निहाय संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना एक शिवसेना मंत्री जोडून जनतेच्या विकासांची कामं वेगाने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणार आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी आतापासूनच शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे शक्तीप्रदर्शन
शिवसेनेने ही बैठक बोलावली असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी मुंबईमध्ये मेळाव्यांचं आयोजन केल आहे. या दोन्ही मेळाव्यांमध्ये अजित पवार यांच्याकडे जास्त आमदार असल्याचं पाहायला मिळालं. तसंच आपल्याला 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे.एवढच नाही तर अजित पवारांच्या गटाने निवडणूक आयोगातही धाव घेतली आहे. तसंच राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह असल्याचं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं आहे. एवढच नाही तर अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *