मुंबई 03 नोव्हेंबर : महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे अडचणीत आले आहेत. संभाजी भिडे यांनी कपाळाला टिकली नाही म्हणून महिला पत्रकारासोबत बोलण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भिडे यांनी महिला आयोगाकडून नोटीसही देण्यात आली आहे. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनीही संभाजी भिडे यांच्या एका कवितेच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर करत संभाजी भिडे यांच्या या विधानावर निशाणा साधला आहे.
काय आहे प्रकरण –
संभाजी भिडे हे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, पण या भेटीनंतर महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं. मंत्रालयातून बाहेर आल्यानंतर महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचं कारण विचारलं, पण संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराला उत्तर दिलं नाही. तुम्ही टिकली लावली नसल्यामुळे आपण उत्तर देणार नसल्याचं संभाजी भिडे म्हणाले.
‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला दिली आणि ते निघून गेले.