जळगाव : जिल्ह्यात जळगाव अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐेरणीवर आला आहे. त्यावर यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच बुधवारी पहाटे लातुर मनपाचे माजी आयुक्त तथा जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी त्याविरोधात रणशिंग फुंकले. पहाटे दोन ते तीनच्या सुमारास श्री. मित्तल निमखेडी, बांभोरी परिसरात कारवाईसाठी थेट नदीपात्रालगत उतरले. पळून जाणाऱ्या माफियांचा त्यांनी अर्ध्या किलोमीटरपर्यंत धावत पाठलाग केल्याचा थरार पहाटेच्या सुमारास घडला.
संशयितांना पकडण्यासाठी मित्तल यांच्या मागोमाग त्यांचे दोन सुरक्षारक्षक, तहसीलदार नामदेव पाटील, महसूलचे चार कर्मचारीही धावले. या कारवाईत एक ट्रॅक्टर, डंपर जप्त करण्यात आला. सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तालुका पोलिस ठाण्यात पोचले.
जून महिन्यापासून वाळूउपसा बंद आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने नद्यांना पाणी चांगले आहे. त्यासोबत प्रचंड वाळूही वाहून आली आहे. मात्र वाळू गटांचे लिलाव न झाल्याने वाळूउपसा बंद आहे. नदीपात्रातून वाळू चोरून तिची विक्री होत असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते.
बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी मित्तल वाहनचालक सचिन मोहिते, सुरक्षारक्षक शिंदे, दीपक पाटील यांच्यासह साध्या वाहनातून वाळूमाफियांवर कारवाईसाठी बांभोरी परिसरात आले. तेथे कोणी आढळले नाही. नंतर निमखेडी परिसरात आले. दरम्यान त्यांच्या वाहनांभोवती दोन-तीन दुचाकी वाहनांवर सहा ते सात जण चकरा मारताना आढळले. ते मोबाईलवर बोलून कोणाला तरी माहिती देत असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, निमखेडी परिसरात तहसीलदार नामदेव पाटील, महसूल कर्मचारी प्रदीप राजपूत, किशोर ठाकरे, अतुल जोशी, वाहनचालक मनोज कोळी यांनाही बोलविण्यात आले. ते पोचताच जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीभोवती फेऱ्या मारणाऱ्यांना पकडण्यासाठी जिल्हाधिकारी मित्तल निमखेडीत धावले. तेथे असलेल्या अरुंद गल्ल्यांचा फायदा घेत संबंधित पळाले. मात्र इतर सात जणांना पकडण्यात यश आले. त्यांना वाहनात बसवून जिल्हाधिकारी मित्तल यांनी तहसीलदार पाटील व इतरांसह नदीपात्रात कारवाईसाठी कूच केले. तेथे काही वाहने ताब्यात घेण्यात आली. काही जणांनी रिकामी वाहने पळवत नेली. एक डंपर (एमएच १९, सीवाय ६१६१), एक ट्रॅक्टर पकडण्यात आला. ज्या संशयितांना पकडले त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी तक्रार दिली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची लातुरात पण धडाकेबाज कारवाई साठी प्रसिद्ध झाले होते.