• Tue. Apr 29th, 2025

फडणवीसांची मोठी घोषणा:खासगी कंपन्यांसोबत लवकरच 1 लाख रोजगारांबाबत करार, पोलिस भरतीची जाहिरात आठवडाभरात

Byjantaadmin

Nov 3, 2022

मुंबई:-खासगी कंपन्यांमध्ये लवकरच 1 लाख तरुणांना रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी राज्य सरकार कंपन्यांसोबत करार करेल, अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तसेच, राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढू. पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांची भरती करू, अशी घोषणाही फडणवीसांनी केली.

राज्य शासनातील रिक्त 75 हजार जागा भरण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. या भरतीची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे व फडणवीसांच्या हस्ते काही जणांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

फडणवीस यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार देशभरात 10 लाख जणांना शासकीय नोकऱ्या देणार आहेत. राज्यांनीही या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मोदींनी केले होते. त्याला सर्वात पहिले प्रतिसाद महाराष्ट्र राज्याने दिला. महाराष्ट्र सरकारने 75 हजार शासकीय जागांच्या भरतीची घोषणा केली आहे. त्यानुसार पुढील महिना किंवा सव्वा महिन्यात ग्रामविकास विभागातील रिक्त साडे दहा हजार जागा भरण्याची जाहीरात काढली जाईल.फडणवीस यांनी सांगितले की, पोलिस विभाग व ग्रामविकास विभागासोबतच शासनाच्या प्रत्येक विभागातील रिक्त जागा भरण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यंत पारदर्शीपणाने या जागा भरण्यात येतील. अनेक विभागांच्या परीक्षा घेण्याचे काम एमपीएससीला देण्यात आले आहे.

फडणवीस यांनी सांगितले की, खासगी क्षेत्रातही तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लवकरच खासगी कंपन्यांसोबत एक लाख रोजगारांबाबतचे करार (MOU) करण्यात येतील. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवण्यात येतील. त्यातून एक लाख तरुणांना रोजगार मिळेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed