अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार १८२ जागांवर दोन टप्प्यात म्हणजे १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होईल. तर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन्ही गुजरातचे आहेत. भाजपचे टॉपचे नेते या राज्यातून असल्याने येथील विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सर्वाचे लक्ष आहे. आतापर्यंत या राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप असे लढतीचे चित्र होते. या वेळी मात्र आम आदमी पक्षाने देखील उडी घेतली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आप या निवडणुकीत मेक या ब्रेकच्या धरतीवर मैदानात उतरली आहे. दोन वेळा दिल्लीची सत्ता आणि या वर्षी पंजाबमध्ये मिळालेला मोठा विजय या पार्श्वभूमीवर आपचा आत्मविश्वास वाढलेला आहे. राज्यात आपला चांगला प्रतिसाद मिळाल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षापासून राज्यात काँग्रेसच विरोधी पक्ष आहे. अशाच आपने हा जागेवर दावा केला आहे. आपने जर काँग्रेसच्या बरोबरीची कामगिरी केली तर त्याचा पक्षावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
गुजरात निवडणुकीचे परिणाम विरोधी पक्षांवर देखील होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. विधानसभा निवडणुकीआधी ओपिनियन पोलनुसार सध्या तरी राज्यात भाजपला बहुमत मिळेल असे म्हटले आहे. तर काँग्रेसला मागे टाकत आप राज्यात मुख्य विरोधी पक्ष होऊ शकतो.
काय सांगतो टाइम्स नाउ नवभारताच ओपिनियन पोल
टाइम्स नाउ नवभारताच ओपिनियन पोलनुसार भाजपला १२५ ते १३१ जागा मिळतील. त्यानंतर काँग्रेसला २९ ते ३३ तर आपला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्यला २ ते ४ जागा मिळतील. या ओपिनियन पोलनुसार मतांच्या टक्केवारीत काँग्रेस आपच्या तुलनेत मागे पडू शकते. काँग्रेसला २१ टक्के तर आपला २४ टक्के मते मिळतील. भाजपला ४८ टक्के इतकी मते मिळण्याचा अंदाज आहे.
ABP-CVoterचा ओपिनियन पोल
गेल्या दोन दशकापासून राज्यात भाजपचे सरकार आहे. हिंदुत्वाची प्रयोगशाळा असे मानले जात असताना आपने प्रवेश केला आहे. ABP-CVoterने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला १३५ ते १४३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. पण त्यांच्या मतांची टक्केवारी कमी होईल असे देखील म्हटले आहे. काँग्रेसला झटका देत आप अनेक मते स्वत:कडे खेचू शकते. पण त्यांना २ पेक्षा जास्त जागा मिळणार नाही.
CSDS-Loknitiचा ओपिनियन पोल
लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने गेल्या वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या कामगिरीवर जनतेला विचारणा केली होती. तेव्हा दोन तृतियांश जनतेने सरकारच्या कामावर समाधान व्यक्त केले होते. २०१७च्या तुलनेत ११ टक्के अधिक लोकांनी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले होते.