मुंबईः राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान या मुंबईत दाखल झालेल्या आहेत. २०१९मध्ये अजित पवारांसोबत गेलेले आमदार परत आणण्यासाठी सोनियांवर पवारांनी जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे अजित पवारांचं बंड मोडून काढण्यास मदत झाली. त्याच सोनिया दुहान मुंबईत जाखल झालेल्या आहेत.सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याही आहेत. ५ मे रोजी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेला राजीनामा मागे घेतला होता. तेव्हा पत्रकार परिषदेत त्या शरद पवारांच्या मागे बसल्या होत्या. त्यामुळे त्यांची महाराष्ट्रात चर्चा झाली होती.
आज मुंबई दाखल झाल्यानंतर सोनिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पवार साहेब चेकमेटसाठी प्रसिद्ध आहेत हे लक्षात ठेवा दुपारनंतर समजेल काय परिस्थिती आहे. मी पैलवानांच्या भागातून येते त्यामुळे मला माहिती आहे की चितपट कसं करायच? ते आम्ही करूच जर त्यांच्याकडे 44 आमदार आहेत तर वाट कसली बघत आहेत. आम्ही 9 आमदारांविरोधात निवडणूक आयोगाकडे पत्र दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.सोनिया दुहान पुढे म्हणाल्या. कोणाकडे किती आमदार हे लवकरच स्पष्ट होईल. आज बैठकीला अधिक आमदार असतीलच. उद्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडेल या बैठकीला पवार साहेब 3 वाजता दिल्लीत उपस्थित राहतील. आम्ही सर्व पवार साहेबांसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीच्या आमदारांना परत आणण्याचं श्रेय सोनियांना!
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार गायब होते. हे आमदार म्हणजे – दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील. नाट्यमय पद्धतीने भाजपाच्या गळाला लागलेल्या या आमदारांना परत आणण्याचं काम या २८ वर्षीय तरुणीने केल्याचं म्हटलं जातं. गुरुग्राममधल्या एका हॉटेलमधून सोनियांनी या आमदारांना परत आणलं होतं.
या आमदारांना कसं परत आणलं?
शरद पवारांना या चारपैकी एका आमदाराचा मेसेज आला. त्यांना दिल्लीतल्या कोणत्यातरी हॉटेलमध्ये कोंडून ठेवल्याचं या आमदाराने सांगितलं. त्यानंतर सोनिया आणि त्यांचा सहकारी धीरज शर्मा यांनी या आमदारांचं लोकेशन शोधलं. गुरुग्राममधल्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हे आमदार असल्याचं त्यांना कळलं.. या हॉटेलमध्ये जेव्हा सोनिया आणि धीरज गेले, तेव्हा तिथे भाजपाचे १०० ते १५० कार्यकर्ते उपस्थित होते. ते सर्व परिस्थिीवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर हॉटेलच्या मागच्या दाराने, जिथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, अशा ठिकाणाहून या आमदारांना बाहेर काढण्यात आलं. आणि या आमदारांना शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणण्यात आलं.