• Sat. Jun 28th, 2025

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काहीही फरक पडणार नाही- प्रशांत किशोर

Byjantaadmin

Jul 5, 2023

राजकीय रणनीतीकार आणि कार्यकर्ते प्रशांत किशोर यांनी मंगळवारी (दि. ४ जुलै) रोजी विरोधकांच्या एकजुटीवर भाष्य केले. विरोधकांची एकजुटीला निवडणुकीत तेव्हाच फायदा मिळेल, जेव्हा ते काहीतरी विषय घेऊन समोर येतील. फक्त अंकगणितावर अवलंबून विरोधकांना लाभ होणार नाही. समस्तीपूर येथे माध्यमांशी बोलत असताना प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तथाकथित फुटीवर आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावरही भाष्य केले.

“सत्ताधाऱ्यांविरोधात एखादा विषय आणून त्यावर काम केले तरच विरोधकांना लाभ मिळू शकतो. जनता पक्षाचा ज्यावेळी प्रयोग झाला, तेव्हा त्याला आणबाणीचा विरोध हे कारण होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या जनआंदोलनाचाही या सरकारला पाठिंबा होता. व्हीपी सिंह यांच्या कार्यकाळात बोफोर्स घोटाळ्याच्या मुद्द्याने लोकांचे लक्ष खेचून घेतले होते”, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली. फक्त राजकीय अंकगणित आणि तर्कसंगत नसलेला विचार यावर अवलंबून जर विरोधकांनी आघाडी केली तर तो फक्त लोकांचा एक गट बनून राहिल, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

राष्ट्रवादीचा जनाधार बाजूला जाणार नाही

प्रशांत किशोर यांनी विविध राजकीय पक्षांना निवडणूक प्रचाराची सेवा दिली आहे. सध्या बिहारमध्ये त्यांची ‘जन सुराज’ पदयात्रा सुरू आहे. त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे एक महिना विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा यात्रेला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षातील घडामोडीबाबत बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही पक्षातून काही आमदार फुटून बाहेर पडले तरी त्यांचा जनाधार काही बाजूला जात नाही. या फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात जे काही सुरू आहे, त्यावर तेथील जनतेने निर्णय घ्यायचा आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे झाले, त्यावरून बिहारचे मुख्यमंत्री यांनीही धडा घेतला असून ते सावध झाले आहेत, अशा बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर प्रशांत किशोर म्हणाले की, ब्रेकिंग न्यूजच्या लाटेत वाहून जाण्याइतके राजकारणी हलके नसतात. महाराष्ट्रात जे काही झाले, त्याचा परिणाम इतर राज्यांवर होणार नाही. जसे की, मागच्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीचा इतर राज्यात काहीच परिणाम झाला नव्हता.

तसेच पुढील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईपर्यंत महागठबंधन सध्याच्या रचनेत कायम राहणार नाही, असेही सुतोवाच प्रशांत किशोर यांनी केले. महागठबंधनमधून माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी बाहेर पडले त्याच दिशेने ही आघाडी जाईल. पण लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत काही मोठी घडामोड घडेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

बिहारचे उपमुख्यंमत्री तेजस्वी यादव यांच्यावर सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोलत असताना ते म्हणाले की, चुकीच्या कामामुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जाणाऱ्या राजकारण्याबद्दल आता लोकांना फारसे काही वाटत नाही. त्याच्यावर लोक नाराज होत नाहीत. मात्र विरोधी पक्षातल्या नेत्यांना पकडले जाते आणि जे सत्ताधाऱ्यांशी शांतता करार करून शांत बसतात त्यांना सोडले जाते, हा जनतेसाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *