मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर समर्थकही होते. जितेंद्र आव्हाडांच्या नेमणुकीवर अजित पवारांनी आक्षेप घेतला. एकाच नेत्याला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही, असं अजित पवार म्हणाले. यावेळी पक्षातील नियुक्त्यांची माहिती देण्यात आली. सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करत त्यांना पक्षातील नियुक्त्या आणि पदाधिकारी बदलण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिली.अजित पवार हे आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. आणि याची माहिती विधानसभा अध्यक्षांना कळवली आहे, असं प्रफुल पटेल म्हणाले. तसंच शरद पवार हे आमचे गुरू आहेत. आणि आमची हात जोडून त्यांना विनंती आहे, त्यांचे आशीर्वाद आम्हाला असावेत, असं आवाहन प्रफुल पटेल यांनी केलं. पक्ष आणि चिन्ह आमच्या सोबतआहे. त्यामुळे त्यांना नोटीस काढण्याचा काहीही अधिकार नाहीए, असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.
अजित पवार– विधिमंडळ पक्षाचे नेते
> सुनील तटकरे – प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र)
> अनिल भाईदास पाटील – प्रतोद
> रुपाली चाकणकर – राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष
विरोधी पक्षनेता नेमण्याचं काम हे विधानसभा अध्यक्षांचं असतं. विरोधी पक्षात सगळ्यात जास्त आमदारांची संख्या ज्याची असते त्याची नेमणूक विरोधी पक्षनेतेपदी करतात. निव्वळ राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण व्हावी, म्हणून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला काही अर्थ नाही. बहुसंख्या आमदार हे राष्ट्रवादी पक्षासोबत म्हणजे आमच्याबरोबर आहेत. आम्ही एकत्र काम करतोय. पुढेही आम्ही महाराष्ट्राच्या भल्या करता काम करत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करणार. आणि राज्यातील विकासकामांसाठी केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार, असं अजित पवार म्हणाले.