• Mon. Apr 28th, 2025

पंतप्रधान हमीभाव समिती बांबूची मोदींकडे शिफारस करणार – माजी आ.पाशा पटेल यांची माहिती

Byjantaadmin

Nov 2, 2022
पंतप्रधान हमीभाव समिती बांबूची मोदींकडे शिफारस करणार
   – पाशा पटेल यांची माहिती
    लातूर/प्रतिनिधी:बांबूची उपयोगिता लक्षात घेता पीक पद्धती बदल आणि पर्यायी पीक या संदर्भात धोरण ठरवताना बांबूचा अग्रक्रमाने विचार करावा,अशी शिफारस पंतप्रधान हमीभाव समितीकडून नरेंद्र मोदी यांच्याकडे केली जाणार असल्याची माहिती या समितीचे सदस्य तथा माजी आमदार पाशा पटेल यांनी दिली.
     देशातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी पंतप्रधान हमीभाव समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीची तिसरी बैठक ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथे सोमवारी ( दि.३१ ऑक्टोबर) संपन्न झाली.समितीचे अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी सचिव संजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या बैठकीस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च कमिटीचे संचालक प्रताप बिर्थल,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर मॅनेजमेंट, भुवनेश्वरचे संचालक डॉ.आर.के. पांडा,नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अग्रिकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट,हैदराबादचे डायरेक्टर जनरल डॉ.पी.चंद्रशेखरा,इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चरल रिसर्चचे डेप्युटी डायरेक्टर जनरल डॉ.एस.के.चौधरी,सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायलॅंड ॲग्रीकल्चर,हैदराबादचे संचालक डॉ.व्ही.के.सिंग,मिनिस्ट्री ऑफ ॲग्रीकल्चर एग्रीकल्चर अँड फार्मर्स वेल्फेअरच्या सहसचिव सौ.शुभा ठाकूर,संचालक पंकज त्यागी यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांची या बैठकीस उपस्थिती होती.
    ओरिसा राज्यातील पीक पद्धती बदलासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.समितीचा सदस्य म्हणून मत मांडताना पाशा पटेल यांनी ओरिसासारख्या राज्यात बांबू हे एक उत्तम पीक असल्याचे सांगितले.ओरिसाला मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे.दर तीन वर्षांनी त्या भागात वादळामुळे मोठे नुकसान होते. भात हे तेथील प्रमुख पीक आहे परंतु त्यातून एकरी केवळ ७ ते ८  हजार रुपये उत्पन्न मिळते.त्या ऐवजी बांबूची लागवड केली तर २ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.बांबू हे पीक वादळामुळे वाहून जाणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही तसेच सरकारलाही मदत वाटप करण्याची गरज भासणार नाही. पर्यावरण रक्षण,शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ आणि नुकसान टाळण्यासोबतच पावसाचे पडलेले पाणी जमिनीत मुरवण्यासाठी बांबूची लागवड करावी.
    वर्तमान स्थितीतील पीक पद्धत बदलत असताना शेतकऱ्यांना पर्याय असतो.तसा पर्याय म्हणून बांबुचा सहभाग करावा.शेतकऱ्यांना कोणता पर्याय द्यावा यासाठी एमएसपी कमिटी संशोधन करत असते.या कमिटीने त्यात बांबुचा समावेश करावा,अशी शिफारस मी या बैठकीत केली होती.भविष्यात पीक,मानव आणि पर्यावरण रक्षणासोबतच ऊर्जा निर्मितीसाठी बांबूची भूमिका महत्त्वाची असल्याचे या बैठकीत पटवून दिल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
   समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी एकमताने ही सूचना मान्य केली.त्यानुसार समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बांबूची शिफारस केली जाणार असल्याची माहितीही पाशा पटेल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed