• Thu. May 1st, 2025

प्रत्येक जीवाची काळजी, असे अपघात घडायला नको; बुलढाणा अपघातस्थळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भावना

Byjantaadmin

Jul 1, 2023

बुलढाणा: शनिवारी सकाळी बुलढाण्यात झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असून संपूर्ण बस जाळून खाक झाल्याने अपघाताची भीषणता लक्षात येत आहे. डिव्हायडरला धडकून बस पलटी झाली आणि गाडीतील डिजेलने पेट घेतला यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे दौरे रद्द करत घटनास्थळाकडे धाव घेतली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपघातस्थळी पोहचले असता काही प्रत्यक्षदर्शींनी त्यांना या अपघाताबद्दल माहिती दिली. डिझेलच्या टाकीने पेट घेतल्यांनंतर बसमधील एसी सिलेंडरने पेट घेतला . आग लागल्यानंतर काही लोक पुढील बाजूस पळाले तर काही लोक मागील बाजूस पळाले तसेच बसच्या मध्यभागी असलेले लोक बसची खिडकीतून बाहेर आले अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. यानंतर बसमधील बाहेर आलेल्या लोकांनी रस्त्यावरील ट्रकचालकांकडे मदत मागितली मात्र अंधाराची वेळ असल्याने अपेक्षित मदत मिळाली नाही अशी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आली. अपघाताचे प्रकरण सरकारने गांभीर्यानं घेतलं असून अपघाताची सखोल चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.अपघातस्थळी प्रवाशांचे जळालेले मृतदेह आणि सामान मन हेलावून टाकत होते, खांबाला धडकून डिझेल टँक बस्ट झाली आणि त्यानंतर बस पुढे घासत जाऊन बसला आग लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुर्दैवाने या दुर्घटनेत २५ लोकांचा मृत्यू झाला. बस पलटी झाल्याने त्या लोकांना बाहेर काढण्याचा चान्स मिळू शकला नाही. मात्र, आठ लोक बस मधून बाहेर पाडण्यात यशस्वी झाले ते लोक जखमी असून त्यांच्यावे उपचार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.दुर्दैवाने २५ लोकांना वाचवता आले नाही ही मोठी दुःखद घटना आहे. त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी आलॊ आहोत. समृद्धी महामार्गावर जे अपघात झाले त्यामध्ये दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावरील अपघात हे मानवी चुकांमुळे ड्रायव्हरांच्या चुकांमुळे झाले आहेत. मात्र, असे अपघात होऊन चालणार नाही प्रत्येक जेवाची आपल्याला काळजी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार यंत्रणा वेळेवर पोचल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र, बसचा दरवाजा बंद असल्याने प्रवाशांना बाहेर येत आलं नाही नाहीतर आणखी जीव वाचू शकले असते. भविष्यामध्ये ज्या उपाययोजना आवश्यक असतील त्या केल्या जातील असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *