‘रंग माझा वेगळा’ फेम मराठी टीव्ही बालकलाकार साईशा भोईरची आई पूजा भोईर पोलीस कोठडीत आहे. पूजाने १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकाने आणि त्याच्या पत्नीने केली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी कफ परेड पोलिसांनी पूजाला अटक केली होती. तेव्हापासून ती कोठडीत होती आणि आता तिच्या कोठडीत ८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कारण आणखी लोकांनी तिच्यावर फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वात आधी तक्रार करणाऱ्या जोडप्याशिवाय अनेकांनी पूजाविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत. गुंतवणुकदारांनी काही महिन्यांपूर्वी पूजाच्या कंपनीत पैसे गुंतवले होते, तिने त्यांना आठवड्याला 10 टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्या लोकांना अनेक आठवडे पैसे मिळाले होते परंतु, नंतर त्यांचे चेक बाऊन्स झाले. त्याबाबत विचारणा केली असता पूजाने त्यांना नीट उत्तरं दिली नाहीत म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
दुसरीकडे, नाशिकमधील काही जणांनी पूजाचा पती आणि अभिनेत्री साईशा भोईरचे वडील विशांत भोईर यांच्याविरुद्ध लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पूजाच्या आईने लोकांची ३ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं कळतंय. लवकरच आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी तपास हाती घेणार आहे. सध्या mumbai पोलीस पूजाची चौकशी करत आहेत आणि तिची मुलगी साईशाने यापूर्वी जिथे काम केले होतं, त्या शोच्या सेटवरही चौकशी करत आहेत.