माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या घोटाळ्यासंदर्भात भाजप नेते सोमय्या यांच्या तक्रारीनुसार रायगडमधील कोलई रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट आली असून उध्दव ठाकरेंसह रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी मोठं विधान केलं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसां नी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी २०१९ चा पहाटेचा शपथविधी, मुख्यमंत्रीपदासह राज्यातील राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य केलं.यावेळी त्यांनी अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणाबाबतही सूचक वक्तव्य करताना ठाकरेंचं टेन्शन वाढवलं आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर अलिबागच्या जंगलात 19 बंगले बांधल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी संबंधित विभागात तक्रारही केली होती. मालमत्ता रश्मी ठाकरे यांच्या नावावर आहे. चौकशी सुरू आहे. तर रश्मी ठाकरे यांची चौकशी का होत नाही केली जात नाही असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, याप्रकरणी तक्रार दाखल झालेली आहे. आता लवकरच चार्जशीट तयार होईल. तसेच रश्मी ठाकरे यांच्या चौकशीची आवश्यकता नाही. आणि चौकशी कुणाची करावी आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही. हे पोलीस ठरवतात.याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी उध्दव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले, आमचं सरकार तपासयंत्रणांच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करत नाही. जसे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे करत होते. आम्ही हस्तक्षेप केला तर सिस्टीम नीट चालणार नाही. पोलिसांना ज्याची चौकशी करायची आहे ते करतील . मी एवढेच सांगतो, जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई होणार असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण..?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगले प्रकरणी किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हे बंगले अनधिकृत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. परंतु उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी या आरोप फेटाळून लावत त्याकडे दुर्लक्ष केले होते.
शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर १९ बंगल्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला. हा तपास पुन्हा सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे तसेच वायकर कुटुंबीयांनी कोलईमध्ये १९ बंगल्याचा घोटाळा करताना तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी व झेडपी सीईओ किरण पाटील यांनी या घोटाळ्यात त्यांना सहकार्य केल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं होतं.