शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ शक्य- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे
कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत चिंचोली बल्लाळनाथ येथे मार्गदर्शन
लातूर, दि. 28 (जिमाका) : शेतीमध्ये आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी आधुनिक कृषि तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी सांगितले. कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत चिंचोली बल्लाळनाथ येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सुभाष जाधव होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कृषि विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे, कृषि संजीवनी सप्ताहाच्या जिल्हा समन्वयक कृषि आयुक्तालय पुणे येथील कृषि अधिकारी सुषमा भालेराव, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप जाधव, तालुका कृषि अधिकारी दिलीप राऊत, उपसरपंच सुहास कावळे, मंडळ कृषि अधिकारी अण्णाराव वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.
शंखी गोगलगाय व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी सामूहिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सर्वांनी जागरूक राहून गोगलगाय आपल्या पिकाचे नुकसान करणार नाही, असे आवाहनही श्रीमती शिंदे यांनी केले. तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेंतर्गत ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे, जेणेकरून त्या योजनेचा लाभ मिळेल, असे सांगितले. कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे यांनी सोयाबीन लागवडीचे पंचसूत्री सांगून उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. सोयाबीन पिकावरील हानिकारक शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली, तसेच ऊस लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. पिकाला संरक्षित सिंचन मिळण्यासाठी शेततळे फायदेशीर ठरेल. तसेच ‘महाडीबीटी’ अंतर्गत यांत्रिकीकरण, पीक प्रात्यक्षिक, फळबाग लागवड या बाबींचाही लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी दिलीप राऊत यांनी केले. कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत विविध गावांमध्ये कृषि विभागाच्या योजनांचा प्रसार-प्रचार करण्याची मोहीम सुरू आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवून कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.सूत्रसंचालन कृषि सहाय्यक चव्हाण यांनी केले, मंडळ कृषि अधिकारी अण्णाराव वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि सहाय्यक सुनिता खाडे यांनी प्रयत्न केले.