• Tue. Apr 29th, 2025

शिंदेंसोबत ४० आमदार, निवडून किती येणार? महाकठीण, अंगावर येतील म्हणत भुजबळांनी आकडा सांगितलाच

Byjantaadmin

Jun 29, 2023

मुंबई: गेल्या वर्षी देशानं शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पाहिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सूरतला निघून गेले. त्यांना १० अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. भाजपनं शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदेसोबत गेलेल्या ४० आमदारांचं पुढे काय होणार, त्यातले किती जण निवडून येणार, किती जण घरी बसणार, असे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहेत.

१९९१ मध्ये शिवसेना सोडलेल्या, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास उपमुख्यमंत्रिपदार्यंत पोहोचलेल्या भुजबळांनी शिंदेंच्या बंडावर भाष्य केलं. भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा ते माझगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. भुजबळ १८ आमदारांसोबत पक्षातून बाहेर पडले. त्यांच्याविरोधात पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाईची शक्यता होती. मात्र तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकर चौधरी यांच्यामुळे कारवाई झाली नाही. त्यांची आमदारकी वाचली. पण १९९५ च्या निवडणुकीत भुजबळ यांचा पराभव झाला. शिवसेनेचे नगरसेवक बाळा नांदगावकर यांनी भुजबळांचा १२ हजार मतांनी पराभव केला महाराष्ट्र टाईम्सच्या मटा कॅफेमध्ये भुजबळांना त्यांच्या आणि शिंदेंच्या बंडाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शिंदेसोबत गेलेले किती आमदार निवडून येतील, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर शिवसेना ही शिवसैनिकांच्या रक्तात भिनलेली असते. नेता जरी गेला तरी कार्यकर्ते पक्षासोबत राहतात. माझगावमध्ये आम्ही पक्षाचं काम मजबुतीनं केलं. त्यामुळे मी पक्ष सोडला तरीही शिवसैनिक हलले नाहीत. त्यामुळे मी पराभूत झालो, असं भुजबळांनी सांगितलं.

आता उद्धव ठाकरेंच्या सभा होत आहेत. त्यांनी दिलेला राजीनामा, त्यांना सोडावा लागलेला बंगला, यातून त्यांना सहानुभूती मिळाली. सभेतून ती पाहायला मिळते. या सर्व पार्श्वभूमीवर ४० मधील किती जण निवडून येतील ते सांगणं महाकठीण आहे. आता मी एखादा आकडा सांगितला तर ते माझ्या अंगावर येणार. पण माझी कल्पना अशी आहे की ते दोन आकडी संख्यादेखील गाठू शकणार नाहीत. दहा जण निवडून आले तरी खूप झाले, असं भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed