सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि आमची चर्चा झाली होती. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण मी जर निर्णय बदलला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली ? माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का ? असा टोलाही पवारांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता ? असा आरोप केला होता. या आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलेय.
इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी यावर लक्ष केंद्रीत करावं –
मुंबई, PUNE राज्यात गेल्या सहा महिन्यात 2458 मुली बेपत्ता आहेत आणि ही चिंतेची बाब आहे. 14 जिल्ह्यातून एकूण 4434 मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्य सरकारला एक वर्ष झाले, अनेक प्रश्न समोर आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. महिला आणि मुली यांच्यावर हल्ले होतायंत आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होतेय ही चिंतेची बाब आहे. इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी यावर लक्ष केंद्रीत करावं, असे शरद पवार म्हणाले.
समान नागरी कायद्यावर काय म्हणाले शरद पवार ?
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्यावर बोलले. यात माझी आणि माझ्या पक्षाची भुमिका मी सांगत आहे. याबाबत निती आयोगाने प्रस्ताव मागवले होते, अनेक अहवाल आले आहेत. पण ते अहवाल लोकांसमोर ठेवले नाहीत. यात नेमक्या काय सूचना आहेत ? हे निती आयोगाने सामोरं ठेवलं पाहिजे होतं. यात सरकारची भुमिका स्पष्ट झाली पाहिजे. समान नागरी कायद्याबाबत शीख आणि जैन समाजाची भूमिका स्पष्ट करावी. संपूर्ण माहिती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस समान नागरी कायद्याबाबत भूमिका घेईल. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न सुरु आहेत का ? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशोभनीय वक्तव्य केली जात आहेत.
भाजपची सत्ता असूनही 45 दिवसांपासून मणिपूर पेटलेय –
देशातील अनेक राज्य भाजप सांभाळू शकली नाही. सध्या देशातल्या बहुतांश राज्यात भाजपची सत्ता नाही. अनेक राज्य भाजपच्या हातातून गेले पण आमदार फोडून भाजपने त्या ठिकाणी राज्य आणले. मध्य प्रदेश आणि MAHARASHTRA काय झाले हे सांगण्याची गरज नाही. जिथे भाजपची सत्ता आहे, तिथेच दंगली घडल्या जात आहेत. 45 दिवसांपासून मणिपूर पेटलेले आहे. राज्यातही दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय. कोल्हापूर, नांदेड, अकोला या भागात दंगली घडल्या आहेत. जात आणि धर्माच्या नावावर रस्त्यावर येऊन वातवरण खराब करण्याचं काम सुरू आहे. कायदा सुव्यस्थेच्या बाबतीत चिंतेच वातावरण आहे, राज्यात जातीय दंगली घडवण्याचा प्रयन्त आहे, असे शरद पवार म्हणाले.