• Tue. Apr 29th, 2025

२०२४ साठी काँग्रेसची खास रणनीती; प्रियांका गांधींना देणार मोठी जबाबदारी?

Byjantaadmin

Jun 28, 2023

हिमाचल व कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसनं अत्यंत गंभीरपणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस संघटनेत मोठे बदल करण्याच्या हालचाली सुरू असून प्रियांका गांधी यांना पक्षात थेट दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेले मल्लिकार्जुन खर्गे हे येत्या काही दिवसांत नव्या टीमची घोषणा करणार आहेत. काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे. प्रियांका गांधी यांना पक्षात महत्त्वाचं पद देऊन त्यांना निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोललं जातं. तसं झाल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा त्यांच्याकडं असेल.

हिमाचल आणि कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात प्रियंका गांधी खूप सक्रिय होत्या. दोन्ही राज्यात विजयाचं श्रेय मिळालेल्या नेत्यांमध्ये प्रियांकांचं नावही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस त्यांना नव्या पद्धतीनं लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या त्यांच्याकडं तेलंगण आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी आहे.प्रियांका गांधी यांचा दोन राज्यात प्रचार आणि नंतर विजय हा योगायोग नाही. प्रियांका गांधी यांच्या विषयी लोकांना आकर्षण आहे. निवडणूक प्रचारात प्रियांकांचा सहभाग काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरतो, हेही दिसून आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेतेही त्यांच्यावर थेट हल्ला करणं टाळतात. प्रियांका यांच्याकडं मोठी जबाबदारी असावी अशी मागणी पक्षातील एका गटाकडून सातत्यानं होत असते. त्यामुळं संपूर्ण लोकसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडं येऊ शकते.

‘लडकी हू, लड सकती हू’

काँग्रेस कार्यकारिणीत एकूण ३५ नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यात प्रियांका गांधी यांच्यासह केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, सेलजा कुमारी, माणिकराव ठाकरे, अजय माकन आणि मोहन प्रकाश ही नावं असू शकतात. मल्लिकार्जुन खर्गे येत्या आठवडाभरात या नेत्यांची यादी जाहीर करणार असल्याचं समजतं. काँग्रेसनं यापूर्वी प्रियांका गांधी यांच्याकडं उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं २०२२ च्या निवडणुकीत ‘लडकी है, लड सकती है’ अशी मोहीम राबवली होती. काँग्रेसला निवडणुकीत मोठं यश मिळालं नसलं तरी ही मोहीम चांगलीच गाजली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed