• Tue. Apr 29th, 2025

कर्तव्यदक्ष अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी व्हीआरएस का घेतली?; तर्कवितर्कांना उधाण

Byjantaadmin

Jun 28, 2023

प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व धाडसी अधिकारी अशी ख्याती असलेले आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी निवृत्तीला दोन वर्षे उरली असतानाच स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अचानक त्यांनी असा निर्णय का घेतला, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.केंद्रेकर हे सध्या छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी विक्रीकर आयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीड जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, मनपा प्रशासक आयुक्त ही पदं भूषवली आहेत. सर्वसामान्यांना डोळ्यांपुढं ठेवून काम करणाऱ्या केंद्रेकर यांनी आजवर प्रत्येक पदावर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळंच ते जनतेमध्ये लोकप्रिय होते. लोकांना केंद्रेकर यांचा आधार वाटतो.बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचा आरोप करत बीडची जनता रस्त्यावर उतरली होती. अशा अधिकाऱ्यानं अचानक स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळं चर्चा होणं साहजिक आहे.

सुनील केंद्रेकर यांनी सरकारला पाठवलेला एक अहवाल यासाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल व ती परिस्थिती कशी सुधारता येईल याबद्दल एक विस्तृत अहवाल काही दिवसांपूर्वी केंद्रेकर यांनी सरकारला पाठवला होता. त्यात काही उपाय सुचवण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पेरणीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला १० हजार रुपये मदत करावी, अशीही एक शिफारस त्यांनी केली होती. त्यांच्या या शिफारशीमुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लॉबीकडून व सरकारकडून त्यांना त्रास दिला जात असल्याचं सांगितलं जात होतं

याचबरोबर, विभागीय आयुक्तांकडून सुरू असलेल्या एका अधिकाऱ्याच्या खातेनिहाय चौकशीत मंत्रालयातून हस्तक्षेप सुरू होता. चौकशीचा निकाल संबंधित अधिकाऱ्याच्या बाजूनं द्यावा, यासाठी दबाव आणला जात होता. मात्र, त्यांनी हा दबाव झुगारून लावला होता. हे कारणही त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीमागे असू शकतं, अशी चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed