उत्तर प्रदेशातील भीम आर्मी संघटनेचे सह-संस्थापक अध्यक्ष चंद्रेशखर आझाद उर्फ रावण यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.सहारनपूर इथं देवबंद परिसरात हा हल्ला झाला. अज्ञातांनी रावण यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. सुदैवानं आझाद यांना गोळी लागली नाही, मात्र छर्रे लागल्यामुळं ते जखमी झाले आहेत. त्यांना देवबंद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सहारनपूर पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली. आझाद हे आपल्या कारनं देवबंदचा दौरा करत होते. एके ठिकाणी हल्लेखोरांची कार त्यांच्या जवळ आली. त्यातून रावण यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. एकूण चार राउंड फायर करण्यात आले. ही कार हरयाणा राज्याच्या क्रमांकाची होती. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. त्यांचा शोध सुरू आहे. आझाद यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या जिवाला धोका नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे. हल्लेखोरांची गाडी बराच वेळ आझाद यांच्या कारचा पाठलाग करत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोण आहेत चंद्रशेखर आझाद?
चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील आहेत. वकील असलेले आझाद आंबेडकरी विचारांवर चालणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. २०१४ साली आझाद यांनी विनय रतन सिंह व सतीश कुमार यांच्या साथीनं भीम आर्मीची स्थापना केली. ही संघटना उत्तर भारतातील हिंदू दलितामध्ये शिक्षणाचं काम करते. या संघटनेच्या वतीनं मोफत शाळा चालवल्या जातात. आझाद यांनी आझाद समाज पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला असून ते या पक्षाचे अध्यक्ष आहेत.