तेलंगणातील भारत राष्ट्र समिती सरकारचे अर्थमंत्री हरीश राव, एक्साईज अँड स्पोर्ट्स टुरिझम मंत्री श्रीनिवास गौड आणि ऊर्जामंत्री जगदीश्वर रेड्डी यांनी सोमवारी सायंकाळी भाजपचे माजी खासदार (स्व.) लिंगराज वल्याळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सुपुत्र नागेश वल्याळ यांची सदिच्छा भेट घेतली. या तीनही मंत्र्यांनी नागेश वल्याळ यांच्याशी बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे सोलापूर भाजपत खळबळ उडाली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ सोलापुरात दाखल झालं आहे. ते उद्या पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. तत्पूर्वी सोलापुरात दाखल झालेले केसीआर आणि त्यांच्या मंत्र्यांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच नागेश वल्याळ यांना तीन मंत्री जाऊन भेटले आहेत.माजी खासदार (स्व.) लिंगराज वल्याळ यांचे पुत्र आणि भारतीय जनता पक्षाचा तरुण चेहरा म्हणून नगरसेवक नागेश वल्याळ यांची तेलगु भाषिकांमध्ये ओळख आहे. त्यांच्या भेटीसाठी केसीआरचे अर्थमंत्री हरीश राव व अन्य मंत्री गेले होते. नागेश वल्याळ यांच्यासोबत तीनही मंत्र्यांनी अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. चर्चेचा तपशील समजू शकला नाही. पण राजकीय नेत्यांमध्ये नक्कीच राजकीय चर्चा झाली असेल, अशी चर्चा सोलापुरात रंगली आहे.दरम्यान, सोलापुरातील अनेक कार्यकर्त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. पूर्व विभागातील मतदार हे बीआरएस पक्षाचे असून आगामी निवडणुकीत सोलापूरात पक्षाने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वल्याळ यांची भेट महत्वपूर्ण ठरत आहे. या भेटीसंदर्भात हरीश राव यांच्याशी आमचे कौटुंबीक संबंध आहेत, त्यामुळे ते चहाला माझ्याकडे आले होते. आमचे मूळ गाव हे तेलंगणामधील सिद्धीपेठ आहे, तेथील राव हे आहेत, त्यामुळे ते गेल्या दोन वर्षांपासून येतो असे सांगत होते. आज माझ्याकडे अनपेक्षितपणे चहाला आले आहेत. मी भाजप सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही, असेही नागेश वल्याळ यांनी सांगितले.