• Tue. Jun 24th, 2025

निलंगाच्या युवकाची १० लाखांची फसवणूक, पूजा भोईरच्या जाळ्यात कसा अडकला तरुण?

Byjantaadmin

Jun 25, 2023

लातूर : समाज माध्यमावर झालेल्या ओळखीतून अमिषाला बळी पडत फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. लातूरमध्येही ही असाच प्रकार घडला आहे. इंस्टाग्रामवर रिल्स पाहणे, फॉलो करणे तरुणाला चांगलेच महागात पडले असून त्याला तब्बल १० लाखांचा गंडा बसला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली.गंडा बसलेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव पंकज विनायक जाधव असं आहे. पंकज निलंगा तालुक्यातील शिंदखेड येथील रहिवासी मात्र सद्या तो लातूरमधील शारदानगरमधे वास्तव्यास आहे. पंकजला इंस्टाग्रामचा नाद लागला. त्यावर येणाऱ्या रील्स तो तासनतास पाहत बसायचा. आवडणाऱ्या रिल्सला लाईक, फॉलो करायचा. त्यातील एका बालकलाकाराचे त्याने कौतुक केले. यातून ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधे राहणाऱ्या ‘त्या ‘ बालकलाकाराची आई पूजा निशांत भोईर यांची ओळख झाली. दोघांचं सारखं बोलण होऊ लागले. त्यातून परस्परांमधे विश्वासाचे नाते निर्माण झाले. याचा फायदा घेत त्या पूजाने अधिकचे व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एक स्कीम सांगितली.

pooja kadam bhoir

पंकज अमिषाला बळी पडला आणि त्या कथित स्किमसाठी त्यांनी प्रारंभी एक लाख रुपये भरले. महिन्याला ७ हजार रुपये प्रमाने त्यांना एकूण ७० हजार रूपये मिळाले. मात्र त्या नंतर ही स्कीम बंद झाली असून आता १० लाख करण्यात आली असल्याने आपले पैसे काढून घ्या असे सांगितले. पंकजचा मागच्या स्किममधील व्याज नियमितपणे मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला होता. त्यामुळे, त्यांनी पैसे काढून घेण्यास नकार दिला अन् अधिक व्याजाच्या अमिषाला बळी पडून त्यांनी कथित स्किमसाठी तब्बल १० लाख रुपये भरले. पण त्यानंतर व्याज मिळणे बंद झाले.

पंकजने विचारपूस केली मात्र मिळेल काही तांत्रिक अडचणी आल्याचे सांगण्यात येऊ लागले. मात्र, पंकज यांना संशय येऊ लागल्याने त्यांनी पैशासाठी तगादा लावला. त्यांनतर पूजाने पैसे परत करण्यास मुदत मागितली. मात्र, मुदत उलटून गेल्यावरही पैसे परत देण्यात आले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पंकज यांच्या लक्षात आले अन् त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण मधील पूजा निशांत भोईर विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४५२ / २०२३ कलम ४०६, ४२० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. ए. लोखंडे करत आहेत.

मुंबईनंतर आता पूजा भोईरचा नाशिकमधील कारनामा समोर, काय आहे प्रकरण?

नाशिक : इन्स्टाग्रामवर ‘रील्स’ बनविण्यासह मराठी बालकलाकाराची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या संशयित पूजा विशांत भोईरच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईत लाखो रुपयांचा गंडा घातल्यानंतर नाशिकमध्येही तिने तीन कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याची बाब समोर येत आहे

.पन्नासपेक्षा जास्त नागरिकांना गंडा

शेअर्स घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्लू) मुंबई पोलिसांकडून भोईरचा ताबा घेतला आहे. गुरुवार (दि. ८)पर्यंत पूजा नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून, ‘ईओडब्लू’चे पथक तपासकामी ठाण्याला रवाना झाले आहे. एप्रिल महिन्यात शेअर्सच्या गुंतवणुकीतून ३३ कोटी रुपयांचा अपहार करून अकरा जणांनी नाशिकच्या पन्नासपेक्षा जास्त नागरिकांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर २२ मे रोजी तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला. त्या प्रकरणी गंगापूररोड परिसरातील सिरीन मिडोज येथील रहिवासी अतुल सोहनलाल शर्मा (वय ६६) यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पूजा विशांत भोईर (३२) आणि विशांत विश्वास भोईर (३५, रा. कल्याण, ठाणे) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या ‘शेअर घोटाळा-२’च्या तपासकामी उपनिरीक्षक रुपेश केदार यांचे पथक भोईर यांच्या अधिक चौकशीसाठी ठाण्यात पोहोचले आहे. पूजा नाशिकच्या पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणात आणखी तक्रारदार पुढे आल्याची माहिती आहे. दरम्यान, २० जून २०२२ ते २२ मे २०२३ या कालावधीत शर्मांची फसवणूक झाली. स्वत:चा आर्थिक फायदा करून घेत शर्मांकडून तीन कोटी पाच लाख ११ हजार रुपये वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपात घेतले. मात्र, अपेक्षित परतावा न झाल्या शर्मांनी विचारणा केली. त्यावरून संशयितांनी योग्य उत्तरे न दिल्याने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

शर्मांच्या क्रिकेट क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याने पूजासंदर्भात माहिती दिली. तिच्याकडील ‘अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास ७.७ टक्के मोबदला देण्याचे सांगितले. त्यावरून शर्मांनी पूजाची मुलगी काम करीत असलेल्या मालिकेतील स्थानिक कलाकारांशी चर्चा करून माहिती घेतली. शरणपूर रस्त्यावरील एका ठिकाणी शर्मांना संशयित दाम्पत्य भेटले. त्यांनी गुंतवणुकीतून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर पूजावर विश्वास ठेवत शर्मांसह नाशिकच्या अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, कोणताही परतावा मिळाला नाही. पूजाने दिलेले चेकही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईतही घोटाळा

मराठी मालिकांमधून पदार्पण केलेल्या एका बालकलाकाराची पूजा ही आई आहे. पूजा व तिच्या पतीने अनेकांना गंडा घातल्याच्या तक्रारी राज्यभरातून पुढे येत आहेत. कुलाबा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याची पूजाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. फोनवर संपर्क सुरू झाला. मैत्री झाल्यानंतर पूजाने या दाम्पत्यालाही गुंतवणुकीचा व्यवसायाबाबत सांगितले. गुंतवणुकीवर दहा टक्के नफा देण्याचेही सांगितले. पूजावर विश्वास ठेवून दाम्पत्याने काही लाखांची गुंतवणूक केली. तेथेही पूजाने परताना न देता दिलेले चेक बाऊन्स झाले. १६ लाखांच्या फसवणुकीच्या प्रकरणात १८ मेच्या दरम्यान तिला कफ परेड पोलिसांनी अटक केली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *