चेक न वटल्याने सहा महिन्यांचा कारावास
निलंगा : हात उसने घेतलेल्या पैशापोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अॅड. अंजू मुकुंदराज हालसे यांना 6 महिने कारावास व 5 लाख 60 हजार रुपये फिर्यादीस देण्यास सूचवले.निलंगा येथील अनिल रंगराव सूर्यवंशी यांनी कौटुंबीक नात्यातून अंजू मुकुंदराव हालसे (रा. औराद शहाजानी, हल्ली मु. लातूर) यांना 2020 साली हात उसने पैसे त्यांच्या कौटुंबीक गरजेसाठी दिले होते. त्याच्या पोटी अॅड. अंजू मुकुंदराव हालसे यांनी अनिल रंगराव सूर्यवंशी यांना 5 लाखांचा धनादेश दिला. सदर धनादेश न वटल्यामुळे अनिल सूर्यवंशी यांनी न्यायालयात फौजदारी खटला कलम 138 एन.आइ. अॅक्टप्रमाणे दाखल केला. सदर खटल्यात दोन्ही बाजुच्या तपासणी करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुसरे न्यायालय निलंगा एन. ए. एल. शेख यांनी आरोपी अंजू मुकुंदराव हालसे यांना दोषी ठरवत 6 महिने कारावास, 5 लाख 60 हजार भरपाई फिर्यादीस देण्याबाबत शिक्षा सुनावली. फिर्यादी अनिल रंगराव सूर्यवंशी यांच्यातर्फे विधिज्ञ सोमेश्वर के. कस्तुरे यांनी काम पाहिले.