नांदेड: एसटी बसच्या दरवाजासमोर थांबून प्रवास करणे एका प्रवाशाच्या जीवावर बेतलं आहे. धावत्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने प्रवाशाचा तोल जाऊन मृत्यू झाला. मुखेड – कंधार रोडवरील शेल्लाळी पाटीजवळ मंगळवारी ही दुर्देवी घटना घडली आहे. लक्ष्मण शेषराव गायकवाड (वय ४२ वर्ष) असं या मृत प्रवाशाच नाव आहे. या घटनेने कंधार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण शेषराव गायकवाड हे कंधार तालुक्यातील कल्लाळी येथील रहिवासी आहेत. मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे. मंगळवारी गायकवाड हे अंबुलगा येथे आपल्या साडूभाऊला भेटून परत कंधार- मुखेड बसने सावरगाव येथे सासुरवाडीला जात होते. बसमध्ये प्रवाश्यांची मोठी गर्दी होती. बसायला जागा नसल्याने लक्ष्मण गायकवाड हे एसटी बसच्या दरवाजा समोर थांबले होते. दोन ते तीन किलोमीटर त्यांनी दरवाजा समोर थांबून प्रवास केला. आंबूलगा – सावरगाव मार्गा जवळील शेल्लाळी पाटी जवळ येताच बसच्या दरवाजाचा हुक अचानक तुटला आणि दरवाजा अचानक उघडला.
चार मुलींचे पितृछत्र हरवले
लक्ष्मण गायकवाड यांना पत्नी आणि चार मुली आहेत. मिळेल ते काम करुण संसार चालवायचे तसेच आपल्या मुलींचे शिक्षण पूर्ण करत होते. मात्र, नियतिने घात केला आणि मुलींच्या डोक्यावरील पितृछत्र हरवले. या घटनेने गायकवाड कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळला आहे.
एसटी महामंडळात अनेक बसेस नादुरुस्त आणि भंगार अवस्थेत आहेत. अश्या भंगार झालेल्या गाड्या ग्रामीण भागात चालविल्या जातात. रस्त्यावर कधी ही एसटी बस बंद पडते. प्रवाश्यांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सद्या एसटी बस मधून प्रवास करणाऱ्यांची वाढली आहे. एसटी महामंडळाला उत्पन्न देखील मिळत आहे. तरी देखील भंगार बसेस चालविल्या जातं असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जातं आहे