बई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेले व पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना लक्ष्य करणारे ठाकरे पिता-पुत्र व खासदार संजय राऊत हे ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीनं मुंबईत सुमारे १५ ठिकाणी छापे टाकले असून त्यात ठाकरे व राऊत यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे.करोना काळात मुंबई महापालिकेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप आहे. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. तसंच, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या विरुद्ध तक्रारही केली होती. पाटकर हे लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे प्रमुख आहेत. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरविण्याचं काम या कंपनीला देण्यात आलं होतं. याच कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांची चौकशी सुरू केली होती. आता या प्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केला असून आज छापे टाकले आहेत.
मुंबईत एकूण १२ ते १५ ठिकाणी ईडीचे अधिकारी पोहोचले असून झाडाझडती सुरू आहे. त्यात सुजीत पाटकर यांचं घर व कार्यालयासह मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार व अन्य लोकांशी संबंधित ठिकाणांचाही समावेश आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे विश्वासू समजल्या काही लोकांकडंही ईडीनं मोर्चा वळवल्याचं समजतं.आदित्य ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे सूरज चव्हाण यांच्या घरीही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे. युवा सेनेची आंदोलनं व शिवसेनेच्या निवडणूक नियोजनामध्ये सूरज चव्हाण महत्त्वाची भूमिका बजावतात, असं सांगतिलं जातं.