कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात आलेल्या खर्चावरून bjp पक्षाचे दोन आमदार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. निवडणुकीत अंकोला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेणे कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यातील शिवराम हेब्बार आणि दिनकर शेट्टी या दोन भाजप आमदारांना महागात पडू शकते. ते निर्धारित मर्यादेत मतदानखर्च सादर करू शकले नाहीत, तर त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.
माजी मंत्री हेब्बार, आमदार दिनकर शेट्टी आणि भाजपच्याच इतर चार अशा सहा उमेदवारांसाठी तीन मे रोजी प्रचार सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारसभेत भाग घेतला होता, त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारले होते. जिल्हा खर्च निरीक्षण समितीने व्यासपीठ आणि कार्यक्रमाचा एकूण खर्च १.१० कोटी रुपये इतका गृहीत धरला आहे. त्यामुळे सहाही उमेदवारांना हा खर्च समान वाटून घ्यावा लागला. परिणामी, प्रत्येक उमेदवाराचा मतदानखर्च १८.३३ लाख रुपये इतका झाला.
यासोबतच प्रचारसभेला लोकांना नेण्यासाठी गोव्यातील कदंबा परिवहन महामंडळाच्या १५० बसेससह सुमारे ८०० बसेसचा भाड्याचा खर्चही या कार्यक्रमात करण्यात आला. कर्नाटक रस्ते वाहतूक परिवहन महामंडळाने आयोजकांना १.३५ कोटी रुपये आकारले आहेत, तर गोवा कदंबा परिवहन महामंडळाने खर्चाचा तपशील देण्यास नकार दिला आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चात या खर्चाची भर पडल्यास सहा उमेदवारांची विधानसभा निवडणुकीतील प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक आयोगाने निर्धारित केलेली कमाल ४० लाख रुपयांची मर्यादा ओलांडली जाईल.
जिल्हा निरीक्षकांनी तपशील मागितला
जिल्हा खर्च निरीक्षकांनी एकूण खर्चाच्या तपशीलाबाबत सहा उमेदवारांकडून उत्तर मागितले होते. उमेदवारांनी, अधिकाऱ्यांनी ज्या दराने खर्च मोजला होता, त्याला आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दरांनेच आम्ही खर्च गृहीत धरला आहे, असे जिल्हा खर्च निरीक्षक सतीश जी. पवार यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाचा दावा
जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी असा दावा केला की, मोदी कार्यक्रमाव्यतिरिक्त प्रत्येक उमेदवाराने वैयक्तिक रॅली, पत्रिका, प्रचार साहित्य आणि इतर गोष्टींवर पैसे खर्च केले आहेत. त्यांच्यापैकी काहींनी तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभेत व्यासपीठावरील कार्यक्रमात भाग घेतला होता. या सर्व बाबींचा विचार केल्यास एकूण खर्च ४० लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले
मोदींच्या चाहत्यांनी बस भाड्याने घेतल्या?
भाजपच्या सहाही उमेदवारांनी बस भाड्याने घेण्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मोदींच्या चाहत्यांनी बस, जीप, टॅक्सी आणि इतर वाहने भाड्याने घेतले होते, असे शेट्टी म्हणाले. मोदी आणि योगींच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांचा एकूण मतदान खर्च ३७ लाख रुपये असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हेब्बार यांनी दावा केला आहे की, अद्याप त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही आणि ती मिळाल्यास ते कायदेशीर अटींमध्ये उत्तर देतील.
कदंबा बसभाड्याचा तपशील मागविला
उपायुक्त प्रभुलिंग कवळिकट्टी म्हणाले की, ‘स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी बस भाड्याने घेतलेल्या लोकांविरुद्ध (अंदाजे १५० व्यक्ती) एफआयआर दाखल केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी गोवा सरकारला पत्रे लिहून कदंबा बसेस भाड्याने घेतलेल्या व्यक्तींचा तपशील मागवला आहे. त्यांना लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत तपशील द्यावा लागणार आहे. मिळविलेल्या आकडेवारीच्या आधारे जिल्हा प्रशासन पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवणार आहे.’