• Mon. Apr 28th, 2025

स्पर्धात्मक युगात डिजिटल मीडियाने आपली विश्वासार्हता निर्माण करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Byjantaadmin

Oct 30, 2022

सातारा:-कोणत्याही प्रकारची बातमी लोकांपर्यंत क्षणार्धात पोहोचविण्याचे काम डिजिटल मीडिया करीत आहे. डिजिटल मीडियाशी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक जोडलेली आहेत.  तरी या माहिती पोहचविण्याच्या स्पर्धात्मक युगात डिजिटल मीडियाने आपली विश्वासार्हता निर्माण करावी. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनास दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले.

  मुख्यमंत्री श्री. शिंदे संदेशात पुढे म्हणाले, पुस्तक व डिजिटल अशी दोन्ही माध्यम आज अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. कोरोना संकटाच्या काळात डिजिटल मीडियाने चांगली कामगिरी करुन नागरिकांना जागृत करण्यासोबतच धीर देण्याचे मोठे काम केले आहे. विविध सुविधांसाठी  संघटनेने एक आदर्श नियमावली व आचार संहिता तयार करावी. सत्यता, सभ्यता व लोकाभिमुखता या त्रिसुत्रीच्या माध्यमातून मीडियाचा विस्तार करावा. लोकांपर्यंत क्षणार्धात माहिती पोहचविण्याचे हे साधन आहे. या क्षेत्रातील संपादक पत्रकारांच्या समस्या या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत नक्की पोहोचतील. डिजिटल मीडियातील बांधवांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा निश्चित पणे प्रयत्न करु, असेही ते यावेळी संदेशात म्हणाले.

टेंभू येथील गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करु – पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, संघटनेने स्थानिक स्तरावर नियमावली तयार करुन द्यावी.  त्या आधारे त्यांना अधिकृत म्हणून ओळखपत्र देण्याविषयी कार्यवाही करता येईल. टेंभू ता. कराड येथील गोपाळ गणेश आगरकर यांचे स्मारक व्हावे, अशी पत्रकारांची मागणी आहे. या मागणीचा विचार करुन   ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा केला जाईल. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याशी चर्चा करुन या स्मारकाविषयी असलेल्या अडचणी सोडवून ते नक्की मार्गी लावू.

डिजिटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पत्रकारिता ही संकल्पना झपाट्याने विस्तारत आहेत. माध्यमाची पोहोच आणि गतिमानता ही बलस्थाने लक्षात घेऊन डिजिटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे आहे. लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आज झालेल्या अधिवेशनात ज्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्याचा सकारात्मक विचार करुन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

खासदार श्री. पाटील म्हणाले, पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. आजची पत्रकारिता बदलली असून त्याला आधुनिकतेची जोड मिळत आहे. पत्रकारांनी सत्याला वाचा फोडून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावावी.

संघटनेचे अध्यक्ष श्री. माने यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेची भूमिका विषद करुन डिजिटल माध्यमांचे महत्व सांगितले. तसेच त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी आणि समस्या या विषयी माहिती दिली. तसेच डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधी कोण चुकत असेल तर त्या चुकाही वेळीच निर्देशनास आणून द्याव्यात, असेही ते म्हणाले.

यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्मरणिका, पुस्तक व विविध दिवाळी अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed