होसुर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
वीस वर्षानंतरच्या भेटीने पुन्हा जपले ऋणानुबंध
निलंगा:-महात्मा फुले विद्यालय होसुर ता. निलंगा येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वाघंबर देवराव मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून हुलाजी हणेगावे , तुळशीदास बिरादार व म्हेत्रे सर हे मान्यवर उपस्थित होते . वीस वर्षांपूर्वीच्या शालेय आठवणी व बालमित्रांच्या अनेक वर्षानंतरच्या भेटीने भावनिक व आनंददायी वातावरणात हा सोहळा शालेय मैदानावर संपन्न झाला .
हा स्नेह मेळावा म्हणजे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी असाच होता . शाळेतील सन 2002- 2003 दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते . शालेय जीवनातील आठवणी या अविस्मरणीय व चिरंतन असतात . संपूर्ण जीवनभर त्या आपणास प्रेरणा ,स्फूर्ती व आनंद देत असतात . त्यानिमित्ताने पुन्हा एकदा शालेय जीवनाची अनुभूती आठवणीच्या रूपाने याद्वारे येत असते .
गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे*,आमुची तू शिक्षणदायिनी आम्ही तिचीच हो पाखरे
हा भाव प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात दिसून येत . यावेळी प्रत्येक जण शालेय जीवनाच्या आठवणीत हरवून गेला . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जणू बालपणीचा काळ सुखाचा हाच भाव जाणवत होता . बालपणीच्या काही आठवणी मनाच्या कोपऱ्यात अजूनही दाटलेल्या असतात . त्यांना अशा मेळाव्याच्या रूपाने हलकेच गोंजारले तर त्यांची सय अधिकच गडद होत असते .
बऱ्याच वर्षांनी जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने गप्पांना ,थट्टामस्करीला उधाण आलं होतं . प्रत्येक जण एकमेकांसोबत ‘ शिक्षकांसोबत सेल्फी घेत होते .यावेळी मनीषा बिरादार ,ज्ञानेश्वर मोरे ,रमजान सय्यद ,मदन मुगळे ,शरद मोरे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आठवणींना उजाळा दिला व आपल्या भावना मांडल्या . शिक्षकांचे संस्कार ,तळमळ व जीवनाचा दाखवलेला मार्ग यामुळेच आम्ही यशस्वी झालो . म्हणून शाळेची शिस्त ,संस्कार हे आयुष्यभर उपयोगी पडतील अशा शब्दातून शिक्षक व शाळेचे ऋण त्यांनी व्यक्त केले . सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील गुरुजनांचा यथोचित सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमात 35 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते . शिक्षक , व्यवसाय , पदाधिकारी , नोकरी ,शेतकरी , गृहिणी अशा क्षेत्रात प्रत्येकाने आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे .
दुपारच्या सत्रात जेवणानंतर प्रत्येकाने मनमोकळ्या गप्पा मारल्या . तसेच आठवणीतील प्रसंग ,शालेय गमती -जमती , शिक्षकांचे किस्से ,प्रत्येकाच्या आठवणीतील क्षण सांगून वातावरण आनंददायी केले . तसेच यापुढच्या जीवनात ही प्रत्येकाने सुखदुःखांच्या क्षणी एकमेकांना अशीच सोबत द्यायची असेही ठरवले .
पुन्हा वाटे लहान व्हावे
पाठीवरती दप्तर घ्यावे
पुन्हा वाटे शाळेत जावे
अन जगण्याचे सोने व्हावे अशीच अवस्था प्रत्येकाची झाली होती .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . म्हेत्रे सर यांनी केले तर माधव मोरे यांनी बहारदार सूत्रसंचालनाने सर्वांना खिळवून ठेवले . श्री . केशव बिरादार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .
सहभागी विद्यार्थ्यांची नावे माधव मोरे,रमजान सय्यद ,केशव बिरादार,रतन बिरादार,ज्ञानेश्वर मोरे ,रानबा बिरादार,मनीषा बिरादार ,सत्यकला मोरे, संगीता मोरे, संगीता मोरे, सुनीता बागदुरे ,गणेश बगडुरे ,मदन मुगळे, अनुसया बिरादार ,नजरबी शेख ,सुमित्रा पाटील,रकमाजी सूर्यवंशी ,माधव सूर्यवंशी, स्वरूप पाटील ,नामदेव मोरे,बळीराम मोरे, बालाजी मोरे, सीमा चितकोटे ,शरद मोरे,नेताजी पाटील ,झटिंग बिरादार ,लिंबराज मोरे