मुंबई : राज्यात मॉन्सून यंदा चांगलाच लांबला आहे. दरवर्षी ९ जून पर्यंत सक्रिय होणारा पासून यंदा बिपरजॉय चक्रीवादळ आणि अल निनोमुळे १५ जून येऊन सुद्धा सक्रिय झालेला नाही. याचा परिणाम थेट खरीप हंगामावर झालेला दिसून येत असून मोठ्या प्रमाणात पेरण्या रखडलेल्या आहेत. राज्यात आता पर्यंत केवळ ०.७७ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली असून पाऊस जर लांबला तर याचा थेट परिणाम हंगामावर होणार आहे.राज्यातील खरीप पेरण्याबाबत कृषी विभागाने राज्य सरकारला अहवाल सादर केला असून यात ही माहिती पुढे आली आहे. राज्यात साधारण ९ जून पर्यंत पाऊस पडतो. या दरम्यान, शेतकरी पेरण्या करत असतात. मात्र, जूनचे दोन आठवडे उलटून देखील अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. अनेक जिल्ह्यात उष्णतेचा पारा कायम आहे. यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. तर ज्यांनी पावसाच्या आशेवर पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरण्यांचे संकट ओढावले आहे.राज्य सरकारच्या कृषी विभागाने या संदर्भातील अहवाल मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला. या वेळी कोकण, अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर विभागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यातील बहुतांश पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा आहे. आता पर्यंत राज्यात सारसरीच्या केवळ ८.८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
कोकण विभागात पेरणीचे सरासरी क्षेत्र हे ४. १४ लाख हेक्टर आहे. या पैकी केवळ ०.०३ लाख हेक्टर (०.७७ टक्के) वर पेरण्या झाल्या आहेत. नाशिक विभागात सरासरी क्षेत्र हे २०. ६५ लाख हेक्टर आहे. या पैकी केवळ ०. ६२ लाख हेक्टर (२.९९ टक्के) वर पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभाग अद्याप पेरण्यांना सुरुवात देखील झालेली नाही. कोल्हापूर विभागात पर्णयांचे सरासरी क्षेत्र हे ७. २८ लाख हेक्टर एवढे आहे. या पैकी ०.०७ लाख हेक्टर (०.९१ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे २०. ९० लाख हेक्टर लागवड क्षेत्रापैकी केवळ ०.०१ लाख हेक्टर (०.०६ टक्के) वर पेरण्या झाल्या आहेत. लातूर येथे २७. ६७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ०.०२ लाख हेक्टर (०.०७ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अमरावती विभागात पेरण्यांचे सरासरी क्षेत्र हे ३२. ५९ लाख हेक्टर एवढे आहे. यापैकी केवळ ०.०२ लाख हेक्टर (०.०६ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. नागपूर विभागात पेरण्यांचे सरासरी क्षेत्र हे १९. २५ लाख हेक्टर एवढे आहे. या पैकी पेरणी झालेले क्षेत्र केवळ ०.०००३ लाख हेक्टर एवढे आहे.