• Thu. Aug 21st, 2025

नाट्यगृहाची इमारत लातूरच्या वैभवात भर टाकणारी असेल-माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Jun 14, 2023
नाट्यगृहाची इमारत लातूरच्या वैभवात भर टाकणारी असेल-माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर
नाट्यगृहासह शादीखान्याच्या इमारत बांधकामाची पाहणी
लातूर/प्रतिनिधी ः- लातूरकारांची सांस्कृतीक भुक भागविण्यासाठी नाट्यगृहाची असणारी  गरज ओळखून शहरात नाट्यगृह उभारण्यासाठी मंजूर देऊन त्यासाठी आवश्यक असणार्‍या निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेली नाट्यगृहाची इमारत लातूरच्या वैभवात भर टाकणारी असेल असा विश्वास माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम समाजाची मागणी लक्षात घेऊन गंजगोलाई परिसरात उभारण्यात येत असलेल्या शादीखाना हा मुस्लिम समाजासाठी महत्वाचा असणार आहे. या दोन्ही इमारत बांधकामाची पाहणी करून माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी या इमारती अधिक गतीने पुर्ण करून लवकरच लातूरकरांच्या सेवेत रूजू होतील अशी ग्वाही दिली.
2014 साली राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर लातूरकरांनी विकासासाठी मनपाची सत्ता ही भाजपाच्या  ताब्यात दिली. या सत्ताकाळात लातूरकरांची गरज ओळखून शहरात नाट्यगृह आणि शादीखाना उभारणीसाठी मंजूर देऊन त्याकरीता निधीची उपलब्धता करून देण्यात आली. या दोन्ही इमारतीच्या बांधकामाची पाहणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेरक यांनी केली. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, कार्यकारी अभियंता डि.बी. निळकंठ, उपअभियंता राजेंद्र बिराजदार, शाखा अभियंता प्रदीप मोरे, अभियंता आर.एस. शिरुरे, स्थापत्य अभियंता कृष्णकुमार बांगड, हेमंत गजभिये आदींची उपस्थिती होती.
लातूर हे शिक्षणाचे माहेरघर असले तरी येथे सांस्कृतीक वारसा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच लातूरकरांची सांस्कृतीक व नाट्यचळवळ जोपासली जावी आणि या बाबतची भुक भागावी या अनुषंगाने लातूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नाट्यगृह उभारण्यात येत आहे. 1400 आसन क्षमता असलेले हे नाट्यगृह महाराष्ट्रातील अत्याधुनिक नाट्यगृह असणार आहे. या नाट्यगृहासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रिन रुम्स्, आर्ट गॅलरी, दोन रंगमच, दिव्यांग व वृंद्ध नागरीकांसाठी स्वतंत्र सुविधा तसेच प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र फुड कोर्ट, स्वच्छता गृहाची सुविधा असणार आहे. नाट्यगृहाची ही इमारत संपुर्ण हरीत असणार असून प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तब्बल  40 कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेली नाट्यगृहाची ही इमारत लातूरच्या वैभवात भर टाकणारी ठरणार आहे. सदर इमारतीचे बांधकाम अधिक वेगाने पुर्ण करण्याच्या सुचना देऊन लवकरच हे नाट्यगृह लातूरकरांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी व्यक्त केला.
लातूर शहर हे अल्पसंख्याक बहुल शहर असून या समाजासाठी शहरात अत्याधुनिक व प्रशस्त शादीखाना गरजेचा होता. यासाठी समाजाच्या वतीने सातत्याने मागणीही करण्यात येत होती. याबाबत तात्कालीन सत्ताधार्‍यानी म्हणजेच काँग्रेसने सातत्याने  आश्वासन देऊन या समाजाची दिशाभूल केलेली होती. मात्र महापालिकेत भाजपची सत्ता येताच समाजाची गरज ओळखून गंजगोलाई परिसरात शादीखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देऊन या कामास सुरुवात झाली आहे. मात्र मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात  जाणीवपुर्वक या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असणारा  वाढीव निधी उपलब्ध करून दिला नसल्याचे सांगून माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होताच या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे नाट्यगृहासह शादीखान्याच्या इमातीचे बांधकाम आता अधिक गतीने पुर्ण होईल आणि या इमारती लवकरच लातूरकरांच्या सेवेत रुजू होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. या इमारतीचे बांधकाम वेळेत आणि दर्जेदार व्हावे याकरीता संबंधीतांनी योग्य काळजी घ्यावी अशा सुचनाही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी दिल्या.
या इमारत बांधकाम पाहणीवेळी भाजपा शहर उपाध्यक्ष महेश कौळखेरे, मंडल अध्यक्ष रवि सुडे, माजी सभापती मंगेश बिराजदार, सुनिल मलवाड, मंडल अध्यक्ष विशाल हवा पाटील, विनोद मालू, गणेश गोमसाळे, गणेश हेड्डा, राजू आवस्कर, राहुल पाटील, निलंगा विधानसभा निवडणूक प्रमुख दगडू सोळूंके, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराम ममाळे, निशीकांत मजगे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *