मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीमुळे गदारोळ उडाला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा लोगो असलेली एक जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध झाली होती. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली छापून आलेल्या जाहिरातीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भाजप नेतृत्वाला डिवचल्याची चर्चा सुरू झाली. कारण या जाहिरातीत महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व करत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही नव्हता. त्यामुळे काही भाजप नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्यानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांना सारवासारव करत ही जाहिरात शिवसेनेनं दिलेली नसून आमच्या हितचिंतकांनी दिली असावी, असा खुलासा करावा लागला. सदर जाहिरातीमुळे युतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागल्यानंतर आज शिंदे यांच्या शिवसेनेनं सावध भूमिका घेत नवी जाहिरात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. कारण आजच्या वर्तमानपत्रांमध्येही राज्य सरकारची लोकप्रियता दर्शवणाऱ्या सर्वेक्षणाचा आधार घेत जाहिरात देण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांच्याही फोटो छापण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीत काल शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो छापण्यात आला नव्हता. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केल्यानंतर आजच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचाही फोटो छापण्यात आला आहे. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील या जाहिरातीत दिसत आहेत. तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित फोटोही या जाहिरातीत झळकत आहे
राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडने एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षातील पाच मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिल्याची चर्चा रंगत आहे. मात्र आज वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या जाहिरातीत शिवसेनेच्या या पाच मंत्र्यांसह इतरही मंत्र्यांचा फोटो छापण्यात आला आहे.