काही दिवासांपुर्वी शिंदे गटांचे मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी उस्मानाबादसह राज्यातील २३ लोकसभा मतदारसंघात आम्हीच लढणार, असे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यभरात शिंदे-भाजप लोकसभेच्या कोणत्या जागा लढवणार यावर चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर १५ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत.
फडणवीस यांची जाहीर सभा देखील या निमित्ताने ठेवण्यात आली असूनप्रा.तानाजी सावंत यांच्या दाव्याला फडणवीस कसे प्रत्युत्तर देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर गुरूवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जिल्ह्यात येणार असल्याने धाराशीवकरांना काय भेट देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
राणाजगजीतसिंह पाटील यांनी चार वर्षांपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. OSMANABAD या जोरावरच लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला. तेव्हा शिंदे गटाचे मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील भाजप आमदार राणा पाटील आणि मंत्री सावंत या दोन नेत्यांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे.फडणवीस यांच्या सभेच्या निमित्ताने या दोन नेत्यांमधील कार्यकर्त्यांमधील दरी देखील समोर आली आहे. शासन आपल्या दारीनिमित्त आयोजीत कार्यक्रमाला शिंदे गटाची उपस्थिती असेल तर भाजप त्याकडे पाठ फिरवितो. जिथे भाजप असते तिथे शिंदे गट जात नाही, हे चित्र आहे. दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीत एकोपा दिसून येत आहे. बाजारसमिती निवडणुकीत आठपैकी पाच ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली.त्यात ठाकरे गटाला सर्वाधिक तीन जागेवर सभापती पद मिळाले. त्यामुळे सावंतासह भाजपाला जिल्ह्यात आपले बळ वाढवावे लागणार आहे. सत्ता असली तरी दोघांमध्ये मेळ नसल्याने कार्यकर्त्यामध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. यावर फडणवीस काय तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे. महाविकास आघाडी एकोप्याने राहिल्यास भाजप व शिंदे गटासमोर मोठं आव्हान निर्माण होणार आहे.बाजारसमितीमध्ये जे दिसले तेच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको. त्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस सभा घेऊन वातावरण निर्मीती करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठाकरे गटाशी एकनिष्ट राहिलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा वाढता जनसंपर्क व महाविकास आघाडीची शक्ती याला भाजप व शिंदे गट कसे तोंड देणार ? हे पाहवे लागणार आहे.केंद्र व राज्य दोन्हीकडे सत्ता असल्याने पुढील एक वर्षात जिल्ह्याच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करुन जनतेसमोर जाण्याचा पर्याय भाजप स्विकारेल असे दिसते. विकासकामापासुन कोसो दुर असणाऱ्या व मागास जिल्ह्याच्या यादीत असलेल्या धाराशिवला पुढील काळात काय मिळणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.