• Thu. Aug 21st, 2025

भाजप नेत्यांना मेसेज, शिंदेंची आता फडणवीसांशी स्पर्धा; रोहित पवारांनी सांगितला त्या जाहिरातीमागे दडलेला अर्थ

Byjantaadmin

Jun 13, 2023

अहमदनगर: शिवसेनेकडून राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या एका जाहिरातीवरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा दिली जायची. मात्र, शिवसेनेकडून (शिंदे गट) आज प्रमुख वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर देण्यात आलेल्या जाहिरातीमधून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची इमेज आणखी ठाशीव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यानिमित्ताने शिंदे गटाने पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद आमचेच हे ठासून सांगितल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाने भाजपला दिलेला सुप्त संदेश आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

BJP Vs Shinde Camp

रोहित पवार यांनी शिंदे गटाने वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवर भाष्य करतातना म्हटले की, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भाजपला मेसेज देण्यात आला आहे. आता भाजपला शिंदे गटाची गरज आहे, शिंदे गटाला भाजपची गरज नाही. भाजपची ताकद ही कमी झालेय, शिंदेंची ताकद वाढलेय, हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आहे. तसेच यानिमित्ताने मुख्यमंत्रीपदासाठीचा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील तीव्र संघर्ष समोर आला आहे. अजून निवडणुकीला वर्ष शिल्लक आहे. मग शिवसेनेकडून आत्ताच जाहिरात का देण्यात आली?राज्यात पुढील तीन महिन्यांमध्ये निवडणूक होणार आहे का? गेल्या दहा दिवसांत शिंदे गट आणि भाजपमधील लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपावरुन निर्माण झालेला संघर्ष समोर आला आहे. त्यामुळे शिंदे गटाने ही जाहिरात देऊन भाजपच्या बड्या नेत्यांना एकप्रकारचा संदेश दिला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

त्या जाहिरातीमध्ये नक्की काय?

शिवसेनेकडून (शिंदे गट) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात देण्यात आली आहे. फ्रंट पेजवर झळकणाऱ्या या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकत आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय, जाहिरातीमध्ये एका अंतर्गत सर्वेक्षणाचे निष्कर्ष देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात भाजपला ३०.२ टक्के, शिवसेनेला १६.२ टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून २६.१ तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी २३.२ टक्के जनतेने पसंती दिल्याचा दावा या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी राज्यात पुन्हा सत्ता आल्यास मुख्यमंत्री मीच असेन, असा अप्रत्यक्ष संदेश भाजपला दिल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *