• Fri. Aug 22nd, 2025

फडणवीसांपेक्षा शिंदे ठरले वरचढ; फ्रंट पेज जाहिरातीमुळं भाजपच्या गोटात अस्वस्थता

Byjantaadmin

Jun 13, 2023

शिवसेना शिंदे गटाकडून विविध वर्तमानपत्रांमध्ये भली मोठी जाहीरात देण्यात आली आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी नवी घोषणा देण्यात आल्याने राज्यातील भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली.

‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा देऊन भाजपने २०१९ साली विधानसभा निवडणूक लढविली होती. परंतु २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात झालेली प्रचंड उलथापालथ आणि बदललेल्या समिकरणामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्षभरापूर्वी राज्याची धुरा गेली. आज, मंगळवारी शिवसेना शिंदे गटाकडून विविध वर्तमानपत्रांमध्ये भली मोठी जाहीरात देण्यात आली आहे. मोदी-शिंदेंच्या फोटोसकट देण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी नवी घोषणा देण्यात आल्याने राज्यातील भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यात २६.१ टक्के जनतेला एकनाथ शिंदे यांना तर २३.२ टक्के जनतेला देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पहायचे असल्याचा दावा शिवसेनेकडून देण्यात आलेल्या या जाहिरातीत ठळकपणे करण्यात आला आहे. या संपूर्ण पानभर जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचेच फोटो असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जाहिरातीतून गायब आहे. त्यामुळे २०१९ सालची ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ ही भाजपची घोषणा आता संपुष्टात आली असल्याचे जणू सुतोवाच या जाहिरातीतून करण्यात आले आहे.

सर्वेक्षणाबाबत भाजपकडून स्पष्टीकरण

दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असल्याच्या सर्वेक्षणातील बाबीवर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्रातील जनतेला सध्याच्या सरकारकडून अपेक्षा आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी यांच्याकडून जनता अपेक्षा ठेवून आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेची पसंती कुणाला मिळते, याला जास्त अर्थ असेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *