मुंबईः नेहमी वादाच्या केंद्रस्थानी असणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या आजच्या कृतीने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोखाली नथुराम गोडसेचा फोटो ठेवण्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.गुणरत्न सदावर्तें यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. पत्रकार परिषदेत नथुराम गोडसेचा फोटो ठेवण्यात आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोखाली नथुराम गोडसेचा फोटो दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.’माझ्या पुढील चळवळीत नथुराम गोडसे असणार आहेत’ असं विधान सदावर्ते यांनी केल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. दरम्यान सदावर्ते यांनी शरद पवारांवरही टीका केली.
यावेळी भारतीय संविधानाचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा.. अशा घोषणा देण्यात आल्या. बाबासाहेबांच्या फोटोखाली नथुराम गोडसेचा फोटो ठेवण्यात आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नथुराम गोडसेबद्दल सदावर्ते काय म्हणाले?
सदावर्ते यांनी म्हटले की, मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. मी नथुराम गोडसे यांचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांसोबत लावला आहे. मी संविधानाचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांचा जो खटला चालला. त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. मी संविधानामध्ये PhD केली आहे. मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की गोडसे यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. नथुराम गोडसे यांच्यावरील खटला हा मानवाधिकाराविरोधातील असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. नथुराम गोडसे इथून पुढे माझ्या चळवळीत असतील असेही त्यांनी म्हटले.
शरद पवार व्हायरस निर्जंतुकीकरण रॅली काढणार
पत्रकार परिषदेत बोलताना, गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शरद पवार यांची लायकी आता सगळ्यांना कळली असल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आहे.
सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन चैत्यभूमी पासून शरद पवार व्हायरस चे निर्जंतुकीकरण रॅलीला सुरुवात करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले.