ठाणे: क्रौर्याची परिसीमा गाठली गेलेल्या मिरारोड हत्याप्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील विविध पैलू समोर येताना दिसत आहेत. मिरारोडच्या गीतानगर येथील गीता आकाशदीप या इमारतीमध्ये राहणाऱ्या मनोज साने याने त्याची पत्नी सरस्वती वैद्य हिचा खून करुन निर्घृणपणे तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले होते. ही घटना समोर आल्यानंतर मनोज आणि सरस्वती राहत असलेल्या इमारतीमधील रहिवाशी हादरले होते. या सगळ्या प्रकारानंतर शनिवारी रहिवाशांनी संपूर्ण इमारत धुऊन काढली. यापूर्वीही इमारतीच्या पायऱ्या आणि व्हरांडा धुऊन काढला होता तेव्हा मनोज साने यानेदेखील घराबाहेर दोन बादल्या पाणी ठेवून दिले होते, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.दरम्यान, सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा वेगाने तपास सुरु आहे. पोलिसांनी शुक्रवारी या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांच्या मोबाईलची सर्च हिस्टरी पोलिसांनी तपासली. यामधून पोलिसांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. सरस्वती वैद्य यांची हत्या केल्यानंतर मनोजने मोबाईलवरुन काही माहिती सर्च केली होती. मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते नष्ट होण्यासाठी किती तास लागतात आणि किती तासांनी वास यायला लागतो, अशी माहिती मनोजने सर्च केली होती. पोलिसांनी मनोजच्या घरातून सरस्वती यांच्या मृतदेहाचे १७ ते १८ तुकडे ताब्यात घेतले होते. हे तुकडे तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तज्ज्ञांनी याची तपासणी केली असता मृतदेहाचा १० टक्के भाग गायब असल्याची माहिती समोर आली. पोलीस सध्या शवविच्छेदन चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहेत. यावरुन सरस्वती वैद्य यांच्या हत्येचे नेमके कारण समजू शकेल. सरस्वती वैद्य यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली, असे मनोजने म्हटले होते. शवविच्छेदन अहवालात मनोजचे म्हणणे खरे आहे किंवा नाही, हे स्पष्ट होऊ शकेल.
सरस्वतीच्या तोंडाला फेस आला होता: मनोज साने
पोलीस चौकशीत मनोज सातत्याने सरस्वतीने आत्महत्या केली, हा एकच धोशा लावून बसला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, मला दिवाणखान्यात सरस्वती निश्चेष्ट अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या तोंडाला तेव्हा फेस आला होता. मनोजने सरस्वती वैद्यच्या मृतदेहाचे तुकडे करण्यापूर्वी मोबाईलवर माहिती सर्च केली होती. मृतदेह किती तासांमध्ये कुजतो आणि वास कधी यायला लागतो, हे मनोज सानेने तपासून पाहिले होते.
बॉडीचे तुकडे का केले? अवयव कुकरमध्ये का शिजवले?; पोलिसांच्या प्रश्नावर मनोज साने थंडपणे म्हणाला..
ठाणे: मिरा रोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी समोर आला होता. मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघेजण गीतानगर परिसरातील गीता आकाशदीप इमारतीमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्ये झालेल्या वादातून मनोजने सरस्वती यांच्या हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता या हत्याप्रकरणातील नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. मनोजने सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे विद्युत करवतीने आणि एक्सॉ ब्लेडच्या सहाय्याने असंख्य बारीक तुकडे केले होते. हे तुकडे मनोजने प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले होते, त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार केली होती. अशाप्रकारे मनोज एक-एक करुन सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता.मनोजने मृतदेहाचे तुकडे करुन ते मिक्सरमध्ये टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकजण अवाक झाले होते. मनोजच्या या कृतीबद्दल संताप व्यक्त केला जात होता. ३ जूनच्या मध्यरात्री मनोजने सरस्वतीची हत्या केली आणि ४ जूनच्या पहाटेपासून पुढले सलग ४ दिवस तो बाथरुममध्ये बसून मृतदेहाचे तुकडे करत होता. हे तुकडे बाहेर उघड्यावर तसेच फेकून देणे धोकादायक होते. त्यासाठी मनोज हाडे आणि मांस वेगळे करण्यासाठी एकेक अवयव कुकरमध्ये शिजवत होता, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली. पोलिसांनी मनोजच्या फ्लॅटमधून सरस्वती यांच्या मृतदेहाचे १७ ते १८ तुकडे हस्तगत गेले होते. मात्र, त्यांचे शिर सापडले नव्हते. मनोजने सरस्वतीचे मुंडके कुठे टाकले, याचा पोलिसांकडून शोध होणे अपेक्षित होते. परंतु, मनोजने चौकशीदरम्या आपण सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाच्या डोक्याचेही असंख्य तुकडे केल्याचे सांगितले. हे सर्व तुकडे पोलिसांनी तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात पाठवले आहेत. आता तपासणीनंतर हे कोणते अवयव होते, हे समजू शकेल. मनोज साने हा कमालीचा शांतपणे वागत असून तपासात सहकार्य करत नाही, असे पोलिसांनी सांगितले