• Mon. Aug 18th, 2025

भाजपला सापडली कर्नाटकातील पराभवाची कारणं; पण विरोधी पक्षनेतेपदाचा शोध काही संपेना…

Byjantaadmin

Jun 10, 2023

बंगळूर : karnataka विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत आत्मपरीक्षण बैठक घेणाऱ्या भाजपला पराभवाची तीन कारणे सापडली आहेत. मात्र, विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात पक्षाला अपयश आले. विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे.भाजपने सकाळपासूनच बैठकांचा सपाटा लावला. सकाळी नूतन आमदारांची, दुपारी पराभूत उमेदवारांसोबत बैठक झाली. त्यानंतर कोअर कमिटीची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीतील आपल्या निराशाजनक कामगिरीनंतर पंचवीस दिवसांनी भाजपने गुरुवारी विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी आपल्या विजयी आमदारांशी सल्लामसलत करण्याच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या.राज्यातील पक्षाच्या कारभारावर देखरेख करणारे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी या पदासाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी भाजपच्या आमदारांशी वन-टू-वन चर्चा केली. पक्ष सदस्यांकडून मते आणि सूचना मागवत आहे.

BJP

माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्‍वत्थ नारायण, आर. अशोक, अरविंद बेल्लद आणि एस. सुरेश कुमार यांच्या व्यतिरिक्त बसनगौडा पाटील-यत्नाळ आणि सुनीलकुमार यासारखे फायरब्रँड नेते चर्चेत आहेत. पराभूत उमेदवारांच्या बैठकीत आत्मपरीक्षण करण्यात आले. पराभवाला राज्यातील नेते आणि मंत्री हेच प्रमुख कारण असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.मंत्री प्रतिसाद देत नाहीत. मतदारसंघांच्या समस्यांसाठी पुरेसा व आवश्यक निधी उपलब्ध करून दिला नाही. ही पराभवाची आणखी काही कारणे असल्याची व्यथा काही पराभूत नेत्यांनी बैठकीत व्यक्त केली. दरम्यान, ज्येष्ठ नेते व्ही. सोमण्णा, डॉ. के. सुधाकर, जे. सी. माधुस्वामी यांनी दुपारी पराभूत उमेदवारांच्या बैठकीला हजेरी लावली नाही. गोविंद कारजोळ, मुरुगेश निराणी, ​​बी. सी. नागेश, बी. सी. पाटील, श्रीरामुलू आणि के. सी. नारायण गौडा या बैठकीला उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी म्हणाले, ‘‘अंतर्गत आरक्षण, काँग्रेसने जनतेला दिलेली हमी योजना आणि भाजप सरकारच्या नकारात्मक प्रचारामुळे पक्षाचा पराभव झाला आहे.’’ प्रदेश भाजप अध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, बसवराज बोम्मई, सदानंद गौडा, अरुण सिंग, के. एस. ईश्वराप्पा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *