‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
- बचत पत्राची मुदत दोन वर्षे, व्याजदर मिळणार साडेसात टक्के
लातूर, (जिमाका) : महिला सशक्तीकरणासाठी आणि महिलांचा गुंतवणुकीत सहभाग वाढवण्यासाठी 1 एप्रिल, 2023 पासून ‘महिला सन्मान बचत पत्र’ ही नवीन बचत योजना सर्व पोस्ट कार्यालयांमार्फत सुरु केली आहे. लातूर जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाचे अधीक्षक संजय अंबेकर यांनी केले आहे.
‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेच्या जनजागृती लातूर जिल्ह्यात 10 जून, 2023 ते 30 जून, 2023 या कालावधी सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये विशेष जनजागृती अभियान सुरु करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक गावात जनजागृती मेळावे करणायत येत आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून योजनेची माहिती देणे, घरोघरी पोस्ट ऑफिस योजना पोहोचविणे, पात्र लाभार्थी यांचे तत्काळ नवीन खाते उघडणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
महिला व मुलींसाठी ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजना उपलब्ध असून एका मुलीच्या नावावर किंवा मुलीच्यावतीने तिच्या नावावर तिचे पालक बचत पत्र घेऊ शकतात. या बचत पत्राची मुदत दोन वर्षे राहणार असून या बचत पत्रामध्ये किमान एक हजार रुपये ते जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. एका महिलेच्या नावावर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत कितीही बचत पत्र घेता येतील. मात्र, खात्यामध्ये किमान तीन महिन्याचे अंतर असावे. बचतपत्र योजनेसाठी साडेसात टक्के प्रतिवर्ष व्याज दर राहणार असून हे व्याज चक्रवाढ पद्धतीने असेल. मुदतपूर्व खाते सहा महिन्यानंतरच बंद केले जाऊ शकते. तसेच एका वर्षानंतर 40 टक्के रक्कम काढता येवू शकते. तरी लातूर जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. अंबेकर यांनी केले.