• Mon. Aug 18th, 2025

गुटख्याच्या हफ्ता म्हणून फोन पे वरुन घेतले 25 हजार, पोलीस अधीक्षकांना कळताच निलंबनाची कारवाई

Byjantaadmin

Jun 8, 2023

औरंगाबाद;  गुटख्याचा हफ्ता म्हणून फोन पे (PhonePe) वरुन 25 हजार रुपये घेणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. पैठण डीवायएसपी पथकात असलेल्या या कर्मचाऱ्याने गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याची चर्चा होती. आपण डीवायएसपी पथकात असून कारवाईची भीती दाखवत हा पोलीस कर्मचारी अनेकांकडून पैसे वसूल करत असल्याची चर्चा पोलीस दलात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने गुटख्याचा हफ्ता म्हणून फोन पेवरुन 25 हजार रुपये घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर चौकशी करुन त्याच्यावर निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केली आहे. सचिन भूमे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भूमे हा पैठण येथील डीवायएसपी पथकात कार्यरत होता. दरम्यान यापूर्वीच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा लाडका असलेला भूमे हा तालुक्यातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावाल्यांच्या संपर्कात असायचा. तसेच आपण डीवायएसपी पथकात असून कारवाईची भीती दाखवत हा पोलीस कर्मचारी अनेकांकडून पैसे वसूल करत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील त्याने पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील एका गुटखा माफियाला कारवाईची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केली. शेवटी 25 हजार रुपयांवर तोडपाणी झाली. विशेष म्हणजे हे 25 हजार रुपये भूमे याने फोन पे वरुन घेतले. दरम्यान याची माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना मिळाली होती.

पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती तक्रार…

पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी लोकांना धमक्या देऊन मोठ्याप्रमाणावर पैसे वसूल करत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे आली होती. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला दिल्या होत्या. दरम्यान ज्यात सचिन याने एका गुटखा माफियाकडून 25 हजार रुपये घेतल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी सचिन भूमे याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

अनेकांकडून कारवाईचे स्वागत

सचिन भूमे हा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकात असल्याने त्याला संपूर्ण पैठण तालुक्यात अॅक्सेस होते. त्यामुळे तो तालुक्यात सर्वच पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करायचा. तसेच वरिष्ठांना चुकीच्या गोष्टी सांगून स्थानिक पोलिसांबद्दल गैरसमज निर्माण करायचा. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकारी देखील त्याला वैतागले होते. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईमुळे अनेकांनी कारवाईचे स्वागत करण्यात येत असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *