मुंबई: महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचसोबत मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये एका विद्यार्थीनीची वसतीगृहात अत्याचार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. राज्यात पोलिसांचे नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगाराचे राज्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पंचनामा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या सरकारच्या काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरु आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरु आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत? शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते ते खरेच आहे. संभाजीनगर, अहमदनगर, शेवगाव, अमरावती, नाशिकमध्ये धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस खात्याचा वचक असेल तर गुन्हेगारांची अशी हिम्मत होणार नाही. राज्यात धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजपाचा कुटील डाव आहे. त्यामुळे फडणवीस जाणिवपूर्व अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत का? राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे गृहविभागाचे काम आहे पण गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा काय करते आहे? हा राज्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे.
मुंबईत महिला मुली सुरक्षित नाहीत
मुंबईतील चर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या केल्याचे उघड झाले आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे दिसत आहे. मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणाऱ्या मलबार हिल पासून हाकेच्या अंतरावर असणा-या वसतीगृहात दिवसाढवळ्या एका विद्यार्थीनीवर अत्याचार करून तीची हत्या केली जाते. ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. मात्र, सत्तेवर बसलेल्या लोकांना याचे काहीच वाटत नाही, ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट आहे. मुंबई सारख्या शहरातच मुली सुरक्षित नाहीत. राज्यातून हजारो महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि सरकार मात्र झोपलेले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले