• Fri. May 2nd, 2025

शहीद सुभेदार प्रमोद सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द

Byjantaadmin

Jun 7, 2023

शहीद सुभेदार प्रमोद सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द

  • महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री सहायता निधीतून एकरकमी मदत

लातूर, दि. 07 (जिमाका) : कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले निलंगा तालुक्यातील हरीजवळगा येथील शहीद शुभेदार प्रमोद नारायणराव सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना शासकीय मदतीचा 1 कोटी रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी वीरमाता छबुबाई नारायणराव सूर्यवंशी, वीरपिता नारायणराव बनाजी सूर्यवंशी आणि वीरपत्नी नंदा प्रमोद सूर्यवंशी यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस आयुक्त अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, लातूरचे प्रभारी तहसीलदार महेश सावंत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.

जम्मू काश्मीर येथे गुरेज सेक्टरमध्ये कर्तव्य बजावीत असताना सुभेदार प्रमोद सूर्यवंशी शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनामार्फत 50 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 लाख रुपये अशी एकरकमी 1 कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार : जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या समस्या, विविध विभागाकडील प्रलंबित अर्ज याविषयीची माहिती जाणून घेवून त्याचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक समस्या निकाली निघाल्या आहेत. यापुढेही सातत्याने अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. या माध्यमातून आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या समस्यांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल शरद पांढरे यांनी माजी सैनिकांच्या तक्रारींची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *