• Thu. May 1st, 2025

राष्ट्रवादीला मोठा हादरा : भगीरथ भालके ‘केसीआर’च्या भेटीला; भालकेंसाठी खास विमान पाठविले

Byjantaadmin

Jun 6, 2023

पंढरपूर : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे रवाना झाले आहेत. केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवले आहे. त्यामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा दणका समजला जात आहे.दरम्यान, भगीरथ भालके हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरतं, यावर बरंच काही अवलंबून आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, भालके यांनी आजपर्यंत ‘वेट ॲंड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र, आज ते चार्टर्ड विमानाने हैदराबादला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.अभिजीत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना विधानसभा उमेदवारीबाबत संकेतही दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील भालके, कल्याणराव काळे आणि युवराज पाटील हे विठ्ठल परिवारातील नेतेमंडळी नाराज झाले होते. पवारांनी सोलापुरात बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला आले नसल्याचे आजच्या घडामोडीवरून स्पष्ट होते.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे निमित्त साधून भगीरथ भालके यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यात त्यांनी विधानसभेची आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले. पवारांच्या दौऱ्यानंतर अवघ्या चार दिवसांत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून भगीरथ भालके यांना फोन आला होता. भालके यांनी पक्षात प्रवेश करावा.

विधानसभेच्या उमेदवारीसह पक्षाची आणखी काही जबाबदारी देण्याचा शब्दही राव यांच्याकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भालके यांना बीआरएसमध्ये सामील करून घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री राव यांनी त्यांची कन्या आणि निकटवर्तीय आमदारावर सोपवली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भगीरथ भालके यांच्याशी संपर्क साधून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता भालके यांचा निर्णय झाल्याचे स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *