मुंबई : राज्यातील वन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला होता. मात्र या या बदल्यांमध्ये गुणवत्तेनुसार पदस्थापना देण्यात आलेली नसल्याची तक्रार काही आमदारांकडून करण्यात आल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातून काही दिवसांपूर्वी वन विभागातील मुख्य वनसंरक्षक व वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या होत्या. या बदल्या जाहीर झाल्यानंतर अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर, अॅड. आशीष जयस्वाल (रामटेक), संदीप धुर्वे (आर्णी) व राम सातपुते (माळशिरस) यांनी आक्षेप घेत वनमंत्री मुनगंटीवार यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. या बदल्या गुणवत्तेच्या आधारे न करता चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या आहेत. तसेच बदली धोरणामध्ये अत्यंत मनमानी व अन्यायकारक पद्धतीने करण्यात आले असल्याचा आरोप या चार आमदारांनी या पत्रात केला होता. या सर्व प्रकरणात वरिष्ठांच्या दबावामुळे अनेकजण अधिकारी बोलण्यास धजावत नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी बदली आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आमदारांनी केली होती.आमदारांच्या पत्रांची दखल घेत मुनगंटीवार यांनी बदल्यांच्या आदेशाला स्थगिती देत वन विभगाच्या सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकरणांची दोन दिवसांत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.