• Thu. May 1st, 2025

मविआच्या जागावाटपाच्या चर्चेआधीच काँग्रेसने बाह्या सरसावल्या; ४१ लोकसभा मतदारसंघांचा घेतला आढावा

Byjantaadmin

Jun 6, 2023

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून चर्चेआधीच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४१ जागांचा आढावा घेतला असून काँग्रेस नेतृत्वाने अधिकाधिक जागा लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षानेही लोकसभेच्या १९ जागांवर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. शनिवारी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेसला मोठा जनाधार असून लोकांचा काँग्रेस पक्षावरील विश्वास आणखी वाढला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष जेव्हा जागावाटपाची चर्चा करतील तेव्हा आमच्या मागण्या मांडू तसेच भाजपाला पराभूत कसे करता येईल, याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.”

२०१९ साली जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा काँग्रेसच्या वाट्याला २५ जागा आल्या होत्या. पण त्यांना केवळ चंद्रपूर या एकमात्र मतदारसंघात विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ जागांवर निवडणूक लढविली आणि त्यांना चार जागांवर विजय मिळाला होता. तर शिवसेना आणि भाजप युतीमध्ये शिवसेनेने २३ पैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाने २५ जागी निवडणूक लढवून २३ जागांवर विजय मिळवला.

तथापि, जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर UDHAV THAKRE यांच्या गटाकडे केवळ सहा खासदार उरले आहेत. (महाराष्ट्रातील पाच खासदार आणि एक दिव दमन) सध्याच्या घडीला महाविकास आघाडीकडे एकूण ११ खासदार आहेत. भाजपाकडे २३ खासदार आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे १३ खासदार आहेत. तसेच शिंदे-फडणवीस आघाडीला दोन अपक्ष खासदारांचाही पाठिंबा आहे.

नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

जागावाटपाच्या मुद्दयावर काँग्रेसने ताठर भूमिका घेतलेल्या नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर पक्षातील नेत्यांनीच नाराजी व्यक्त केलेली आहे. विजय वडेट्टिवार आणि सुनील केदार या दोन माजी मंत्र्यांनी पटोले यांच्या नेतृत्वाबाबत काही दिवसांपूर्वी CONGRESS पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. यासोबतच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूसही वाढली आहे. नाना पटोले यांची भूमिका योग्य असल्याचे वाटणारा एक गट आहे. या गटाला वाटते की, काँग्रेसने महाविकास आघाडीचे नेतृत्व करायला हवे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे पक्षाने अधिकाधिक जागा लढवायला हव्यात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यापेक्षा काँग्रेसने कमी जागा लढवू नयेत, असा विचार काही नेत्यांनी बोलून दाखविला.

काँग्रेसमधील आणखी एका नेत्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने नमती भूमिका घेतल्याबद्दल थोडी नाराजी व्यक्त केली. सत्तेचे वाटप आणि खात्यांच्या बाबतीत काँग्रेसने एक पाऊल मागे घेतले होते. धर्मनिरपेक्षता टिकवण्याचे कठीण काम काँग्रेसनेच केलेले आहे. त्याउलट शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक लवचिक आहेत. (भाजपाशी आघाडी करण्याबाबतचा संदर्भ थेट न बोलता दिलेला आहे)

काँग्रेस २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस विसरलेली नाही. त्यादिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निकाल जाहीर होताच भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. (भाजपाने १२२ जिंकून सर्वात मोठा पक्ष झाल्याचे सिद्ध केले होते, मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना २३ जागा कमी पडत होत्या) २०१४ ची निवडणूक महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढली होती. शिवसेनेने स्वबळावर ६३ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीची आवश्यकता भाजपाला लागली नाही.

शिवसेनेच्या (उबाठा) बाबतीत काँग्रेसला वेगळीच चिंता आहे. शिवसेना अल्पसंख्यांक समुदायाची मते मिळवू पाहत आहे. राज्यातील मुस्लीम मतदारांचा काँग्रेसला अनेक काळापासून पाठिंबा राहिला आहे. मुस्लीम मतदारांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचण्यासाठी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत मुस्लीम समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षण मिळण्याची मागणी पुढे केली.

महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष आपापल्यापरिने लोकसभेची तयारी करत असले तरी अद्याप जागावाटपाबाबत अधिकृत चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादीचे नेते AJIT PAWAR यांनी महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाणार हे जाहीर केले आहे. “जागावाटपाचा तिढा तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते सोडवतील. आताच जर तरच्या वक्तव्यांना काहीही अर्थ नाही. प्रत्येक पक्ष आपला जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्यांचा अधिकार आहे.”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *