शेतकऱ्यांनो, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा !
- कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
- पेरणीसाठी 80 ते 100 मिलीलीटर पाऊस आवश्यक
लातूर, दि. 06 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
कृषि विद्यापिठाने किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशी शिफारस केलेली आहे. किमान 80 – 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो. त्यामुळे खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास पावसाच्या खंड काळात पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन लातूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
‘खरीपाची तयारी कृषि विभाग आपल्या दारी’
- कृषि विभाग आजपासून राबविणार विशेष मोहीम
- आधुनिक तंत्रज्ञान, रोग नियंत्रण, योजनांविषयी होणार मार्गदर्शन
लातूर, दि. 06 (जिमाका) : ‘सातबारा’ हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा शब्द, हा जिव्हाळा लक्षात घेवून शेतकऱ्यांसाठी कृषि विभाग 7 ते 12 जून 2023 या कालावधीत कृषि तंत्रज्ञानाचा जागर प्रत्येक गावात करणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत खरीप पिकांचे आधुनिक लागवड तंत्रज्ञान, गावात राबविण्यात येणारे विस्तार विषयक प्रकल्प, पिकावरील किड व रोग नियंत्रण (शंखी गोगलगाय व पैसा) आणि कृषि विभागाच्या प्रमुख योजनांविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषि विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र व अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने ‘खरीपाची तयारी, कृषि विभाग आपल्या दारी’ ही मोहीम 07 जून 2023 ते 12 जून 2023 या कालावधीत क्षेत्रीय स्तरावर राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहीमेमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.