राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच आता सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपात जोरदार खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाने नाशिक आणि उस्मानाबाद या लोकसभेच्या जागांवर दावा ठोकला आहे. त्यामुळं संतापलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनी थेट भाजपावर आगपाखड केली आहे. त्यामुळं आता लोकसभेच्या संभावित जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपात सुप्त संघर्ष रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उस्मानाबादची जागा भाजपा लढवणार असल्याचं वक्तव्य आमदार राणा जगजीत सिंह यांनी केलं, त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेनेला हलक्यात घेऊ नका, असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
उस्मानाबादसह नाशिक लोकसभेच्या जागेवरही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे. भाजपाच्या माजी नगरसेवकाने सोशल मीडियावर पोस्ट करत थेट लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यापूर्वीच भाजपाचे आमदार राणा जगजित सिंह आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात कलगीतुरा रंगल्याने सत्तापक्षात काहीच आलबेल नसल्याचं चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचं बोललं जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरूनही भाजपा आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक मतदारसंघात दोन्ही पक्षांचे उमेदवार फिक्स झाले असून त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे गट देखील अनेक जागांवर उमेदवारांची चाचपणी करत आहे. परंतु आता ऐन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गट आणि भाजपात कलगीतुरा रंगल्याने मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.