राज्यातील सत्तांतराला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. तरीदेखील शिंदे-फडणवीस सरकारचा कॅबिनेट विस्तार झालेला नाही. सरकारमध्ये सध्या केवळ २० मंत्री असून अनेक मंत्र्यांवर एकापेक्षा जास्त विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांना पालकमंत्रीच नसल्याने विरोधकांनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत कॅबिनेट विस्तारावर चर्चा केल्याचं समजतं. त्यानंतर आता भाजपाच्या सहा तर शिवसेनेच्या चार आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या शीर्ष नेत्यांनी दिल्लीतून आदेश देण्यात आल्याचं वृत्त आहे.
भाजपा आणि शिवसेनेत मंत्रिपदासाठी इच्छूक असणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असल्याने मंत्रिपदाची संधी देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारेवरची कसरत होणार आहे. भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांना लवकरच पद व गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता मोजक्याच आणि मातब्बर नेत्यांना संधी देण्यात येण्याीच शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार होणार असून अन्य इच्छूक आमदारांना महामंडळांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कोणत्या आमदारांना मिळणार मंत्रिपद?
भाजपकडून आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, प्रशांत बंब आणि प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून संजय शिरसाट, यामिनी जाधव, शहाजीबापू पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलं काम करणाऱ्या आमदारांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. परंतु कोणत्या आमदारांना मंत्रिपद द्यायचं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेच घेणार आहे.