महाराष्ट्रापेक्षा आंध्रप्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होत होत्या. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिलेल्या सेवा सुविधांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ९९ टक्के थांबल्या आहेत. यामुळे ‘तेलंगणा पॅटर्न’ देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशाला लागलेला कलंक आहे. त्यामुळे पुसण्यासाठी महाराष्ट्रासह देशात ‘तेलंगणा पॅटर्न’ राबविण्याची मागणी ‘बीआरएस’कडून करण्यात येत आहे.
‘बीआरएस’च्या किसान सेलचा महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी.जे. देशमुख यांनी सोमवारी(दि.५) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची आत्महत्या रोखणाऱ्या ‘तेलंगणा पॅटर्न’ची माहिती दिली. कदम म्हणाले, कृषीक्षेत्रासह शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही तेलंगणा सरकारने मोठे काम केले आहे. २०१४ पुर्वी महाराष्ट्रापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या आंध्रप्रदेशात होत होत्या. मात्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर शेतकऱ्यांसाठी शाश्वत पाणी आणि वीज मोफत उपलब्ध करून दिली.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कृषीक्षेत्रासाठी सुक्ष्म आणि दीर्घकालीन नियोजन करण्यात आले. यामध्ये शाश्वत सिंचनासाठी ८४ हजार कोटी रूपयांच्या निधीतून दोन नदी जोड प्रकल्प यशस्वी केला. यामुळे गेल्या ८ वर्षांत तेलंगणाचे तिप्पट क्षेत्र सिंचनाखाली आले. शेती सिंचनाखाली येऊन उपयोग नव्हती तर पिके घेण्यासाठी सरकारने खरीप आणि रब्बी हंगामासाठीच्या खते बियाण्यांसाठी प्रति एकर १० हजार रूपये शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा केले.यानंतर राज्य स्थापनेपूर्वी केवळ तीन तास असलेला वीज पुरवठा २४ तास आणि मोफत केला. तर पिक काढणीनंतर हमीभावाने खरेदी करण्यासाठी ७ हजार खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या विविध शाश्वत उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ९९ टक्के थांबल्याचंही कदम यावेळी म्हणाले
तेलंगणा मधील विद्यार्थी इतर राज्यामध्ये शिक्षण घेत असला तरी त्याचे शैक्षणिक शुल्क तेलंगणा सरकार भरत आहे. तसेच गर्भवती महिलांसाठी ९ महिन्यांचा पौषिक आहार सरकार करत असून, मुल जन्माला आल्यानंतर मुलाच्या नावावर १० हजार ११६ तर मुलीच्या नावावर १२ हजार ११६ रूपयांची मदत केली जाते. असेही देशमुख यांनी सांगितले. या सर्व योजना लोकहिताच्या असल्याने मराठवाड्यातील नागरिक तेलंगणा मध्ये जाण्याच इच्छुक असल्याचंही यावेळी ते म्हणाले.
लवकरच महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री…
आम्ही महाराष्ट्रात काम सुरू केल्यापासून एका महिन्यात १ लाख ८८ हजार सभासद नोंदणी झाली आहे. आमच्या पक्षाकडे शेतकऱ्यांचा येण्याचा वेग पाहता आम्ही लवकरच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभा लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ असा विश्वास माणिक कदम यांनी व्यक्त केला आहे. तसेच २८८ मतदारसंघात आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. आमच्या कामगिरीवर लवकरच महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.