• Sun. May 4th, 2025

आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला; मुख्यमंत्री शिंदेंवर विरोधकांचा हल्लाबोल…

Byjantaadmin

Oct 27, 2022

मुंबई : महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयशी ठरत असल्याचा हल्लाबोलही तपासेंनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर (भाजप) नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत, असाही आरोप तपासे यांनी केला आहे.

वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका असल्याचे तपासेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, युकेच्या पंतप्रधान लीज ट्रस यांनी जसा राजीनामा दिला तसा महाराष्ट्राचे हित जपता न आल्याने एकनाथ शिंदेंनी देखील तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही तपासे यांनी केली आहे.

आता तपासे यांनी केलेल्या या आरोपावर भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर आणि स्पष्टीकरणं येते हे बघावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *